सिडको मंडळाने पर्यावरण अहवाल दडवल्याचा आरोप

पनवेल : दरवर्षी अतिवृष्टीमुळे पनवेल पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते. यामुळे पालिकेने परिसरातील नद्यांचे सर्वेक्षण करून तेथील पूर नियंत्रण रेषा कायम करण्याचा प्रस्ताव शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला मंजुरी देताना सभागृह नेते ठाकूर यांनी थेट सिडको मंडळाच्या कारभारावर बोट ठेवून पनवेल परिसरातील मातीच्या भरावावेळी पर्यावरण अहवालातील सूचनांकडे सिडकोने दुर्लक्ष केल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. सिडको मंडळाने पनवेल महापालिका क्षेत्रात खाडी क्षेत्रावर मातीचा भराव करताना पर्यावरणाचा अहवाल दडवला असा आरोप पालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमातील तरतुदीनुसार सुधारित व एकत्रित प्रारूप विकास योजना तयार करताना नद्यांची पूर नियंत्रण रेषा सर्वेक्षण माहिती आवश्यक आहे.

कासाडी नदीच्या सर्वेक्षणाचीही मागणी

रायगडच्या पाटबंधारे विभागाला एक कोटी १८ लाख रुपयांचा खर्चाच्या प्रस्ताव मंजुरीसाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभेसमोर हा विषय ठेवण्यात आला. मात्र यामध्ये गाढी व पाताळगंगा नद्यांच्या पूररेषेचे सर्वेक्षण होणार असल्याने शेकापचे पालिका सदस्य अरिवद म्हात्रे यांनी कासाडी नदीचे

सर्वेक्षण करण्याची मागणी

केली. तसेच सिडको वसाहतीमधील मुख्य नाल्यांचे पूररेषा सर्वेक्षण करून तेथे दिशादर्शक प्रसिद्ध करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिका सदस्य सतीश पाटील यांनी व्यक्त केली.  या सर्वेक्षणावर निवेदन करताना भाजपचे पालिका सदस्य अजय बहिरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेप्रमाणे नमो गंगे या योजनेअंतर्गत तक्का गावातील नदीपात्रात गणेश घाटावर पाच वर्षांपूर्वी स्वच्छ करण्याच्या योजनेचा शुभारंभ झाला. मात्र तेथे सध्या सिडको मंडळाच्या उदंचन केंद्रातील पाणी सोडून नदीपात्र दूषित केले जात असल्याकडे सदस्य बहिरा यांना लक्ष वेधले. नदीपात्रालगतच्या इमारतींचा मल थेट या नदीच्या पाण्यात सोडला जात असल्याने तहसीलदारांना निवेदन देऊनही यावर कार्यवाही होत नसल्याची खंत सदस्य बहिरा यांनी व्यक्त केली.

अहवाल दडवल्याने पनवेलकरांचे नुकसान

विमानतळाच्या निमित्ताने केलेला भराव, करंजाडे नोड वसविताना आणि बंदररोडच्या खाडीपात्रालगत झालेला भराव यामुळे पनवेलची भौगोलिक स्थिती बदलली आहे. सिडको मंडळाने घाईघाईने व बेजबाबदार पद्धतीने केलेल्या भरावामुळे ही स्थिती पनवेलवर ओढवली आहे. पर्यावरण अहवाल दडवल्याने पनवेलकरांना याचे नुकसान भोगावे लागत आहे. याच चुकीच्या कार्यपद्धतीमुळे पूर्वीच्या तुलनेत सध्याची पूररेषा यामध्ये मोठय़ा प्रमाणात बदल झाला आहे.  यामुळे पूररेषा पनवेल शहराच्या आतल्या बाजूला आली आहे. तसेच बांधकामांवरती मोठय़ा प्रमाणात बंधणे येणार आहे. जोपर्यंत या सर्व रेषांचे सीमांकन ठरत नाही तोपर्यंत पालिकेचा प्रारूप विकास आराखडा पूर्ण बनवता येणार नाही.

या सर्वेक्षणामुळे पुरापासून पनवेलचे नुकसान टाळण्यासाठी कोणकोणती उपाययोजना करता येईल यावरही सर्वेक्षणानंतर माहिती मिळू शकेल. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रेषांमुळे शहराच्या अजून पूररेषा सर्वेक्षणात स्पष्ट झाल्यास सिडको मंडळ नाकारत असलेली जबाबदारी त्यांना मान्य करावी लागेल. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल पालिका