उरण : पावसाळ्यातील दोन महिन्यांमध्ये खोल समुद्रातील मासेमारीबंदीला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या संदर्भात शासनाने आदेश जारी केले आहेत. त्यानुसार १ जून ते ३१ जुलै अशा ६१ दिवसांच्या कालावधीसाठी ही बंदी लागू राहील. हा कालावधी मासळीच्या प्रजननासाठी आवश्यक असल्याने ही बंदी घालण्यात येते. त्यामुळे ताजी मासळी कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने मासळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात येते. या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी केल्यास बोटींवर कारवाई करण्यात येईल. पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. ही मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर- यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका १ जून २०२५ पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. तसेच ३१ जुलै २०२५ वा त्यापूर्वी नौकांना समुद्रात मासेमारीकरीता जाता येणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासुन १२ सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीच्या धोरणानुसार हे आदेश लागू राहतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवार पासून मासेमारी बंदी लागू होणार आहे.या कालावधीत करावयाच्या अंमलबजावणी संदर्भात शनिवारी जिल्हा मत्स्यव्यवसाय कार्यालयात बैठक होणार आहे.- सुरेश बावुलगावे, मत्स्यव्यवसाय विभाग अधिकारी, उरण