scorecardresearch

उरण: रेल्वे स्थानकाच्या नामकरणासाठी धुतुम ग्रामस्थांचा मोर्चा

रांजणपाडा स्थानकाला धुतुम नाव द्या या मागणीसाठी गुरुवारी धुतुम ग्रामस्थांनी स्थानकात मोर्चा काढला.

dhutum railway station
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

उरण: खारकोपर ते उरण रेल्वे मार्गवरील रेल्वेने दिलेल्या रांजणपाडा स्थानकाला धुतुम नाव द्या या मागणीसाठी गुरुवारी धुतुम ग्रामस्थांनी स्थानकात मोर्चा काढला. रेल्वे आणि सिडकोच्या भागीदारीतून खारकोपर ते उरण रेल्वेचे काम सुरू आहे. मात्र येथील स्थानिक व महसूल गावाच्या हद्दी ऐवजी इतर गावांची नावे देण्यात आली आहेत.त्याला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असून स्थानकांची नावे बदलण्यासाठी बोकडवीरा, कोट, नवघर आदी ग्रामस्थांचीही आंदोलने सुरु आहेत.

धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील मौजे शेमटीखार येथील रांजणपाडा रेल्वे स्थानकाचे नाव दुरुस्त करून धुतूम रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यात यावे, तसेच सदर रेल्वे स्थानकात धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील बेरोजगार तरुणांना नोकरीत सामावून घेण्यात यावे,आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना उदरनिर्वाहासाठी सदर रेल्वे स्थानकात व्यवसाय उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीने सिडको आणि रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. या मोर्चात रेल्वे स्थानकाला धुतुम नाव मिळालेच पाहिजे, जमीन आमच्या हक्काची, ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असो आदी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर धुतुम स्थानक नावाची प्रतिकृती ही आंदोलन कर्त्यांना स्थानकात लावली होती.

गुरुवारी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, माजी सरपंच रेश्मा शरद ठाकूर, पी.जी. ठाकूर उपस्थित आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 13:21 IST

संबंधित बातम्या