निर्बंधांमुळे नाराजी

दुसरी लाट ओसरल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार शहरातील बहुतांश व्यवहार ४ जूनपासून सुरू करण्यात आले होते.

नवी मुंबईत मॉल, चित्रपटगृहे, नाटय़गृहे पुन्हा बंद; दुकाने सायंकाळनंतर बंद ठेवण्यास व्यापाऱ्यांचा विरोध

नवी मुंबई : वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्यात घेतले गेल्याने नवी मुंबई शहरात सोमवारपासून (२८ जून) ते ५ जुलैपर्यंत कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात आली असून व्यापारी वर्गामध्ये मात्र मोठी नाराजी पसरली आहे. दुकानांच्या वेळाही बदलण्यात आल्या असून आता दुपारी चार वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहे. सातत्याने होणाऱ्या र्निबधामुळे याचा परिणाम व्यापारावर होत असल्याचे नाराजी दुकानदारांनी व्यक्त केली.

दुसरी लाट ओसरल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार शहरातील बहुतांश व्यवहार ४ जूनपासून सुरू करण्यात आले होते. नवी मुंबई शहर दुसऱ्या टप्प्यात असल्याने शहरातील बहुतांश निर्बंध हटवण्यात आले होते. परंतु करोनाचे संकट अद्यापही कायम असून डेल्टा प्लसच्या संभाव्य धोक्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

सोमवारी सकाळपासूनच शहरातील मॉल, चित्रपटगृहे आणि नाटय़गृहे बंद ठेवण्यात आली होती. एकीकडे शहरात कडक नियम लागू झाले असताना दुसरीकडे शहरातील व्यापारी वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सातत्याने होणाऱ्या बंदमुळे व्यापारावर मोठा परिणाम होऊन मोठय़ा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे दुकान सकाळी उघडले तरी नागरिक खरेदीसाठी ११ नंतर येतात, असे काही दुकानदारांनी सांगितले. शहरातील दुकानांबरोबरच मॉलमधील दुकानचालकांची आर्थिक घडी पूर्णत: बिघडली असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर मॉलमधील आस्थापनांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. ५ जुलैच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध लागू राहणार असल्याने शहारात सायंकाळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद झाल्याचे पाहायला मिळाले.

शहरात वारंवार होणाऱ्या टाळेबंदी व निर्बधांमुळे व्यापारी वर्गाचे आर्थिक हाल होत आहेत. सततच्या बंदमुळे मॉलमधील व्यापारावरही परिणाम झाला आहे. रघुलीला मॉलमध्ये २०० छोटी आणि ८ मोठी दुकाने आहेत. त्यातील काही दुकानेच आता सुरू झाली होती. ती पुन्हा बंद त्यामुळे दुकानदारांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

– संदीप देशमुख, रघुलीला मॉल व्यवस्थापन

शहरात नियमावलीनुसार कडक निर्बंध लागू झाले आहेत. त्याप्रमाणे अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली आहे. नागरिकांनी नियमावली पाळून पालिकेला सहकार्य करावे.

– संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dissatisfied with restrictions ssh