नव्याने निवडणूक प्रक्रिया

नवी मुंबई : राज्य शासनाने मुंबईवगळता इतर महापालिकांत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती आणल्याने नवी मुंबईत निवडणूक तयारी वाया गेली असून आता १११ ऐवजी ३७ प्रभाग अस्तित्वात येणार आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाला नव्याने रचना करावी लागणार आहे. 

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक करोनामुळे मागील दीड वर्षांपासून रखडली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या २०११च्या जनगणनेनुसार ११ लाख १९ हजार ४७७ लोकसंख्या आहे. त्याआधारे प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली होती. या निवडणुकीची तयारी महापालिका प्रशासनाने जुन्या रचनेनुसार केली होती. फक्त निवडणुकीची तारीख जाहीर होणे बाकी  होते. मात्र आता या सर्व तयारीवर पाणी पडले आहे. राज्य शासनाने बहुसदस्यीय पद्धत लागू केल्याने प्रभाग रचनेत बदल होणार आहे. नवी मुंबईत १११ प्रभाग होते. आता नव्या निर्णयानुसार एका प्रभागात तीन नगरसेवक मिळून ३७ प्रभाग होणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत एक सदस्यीय पद्धतीने निवडणुका झाल्या आहेत. पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने आता निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या तयारीबरोबर राजकीय समीकरणेदेखील बदलणार आहेत.

इच्छुकांना आता फक्त १ प्रभागात नव्हे तर ३ प्रभागात म्हणजेच १ पॅनेलमध्ये आपला प्रभाव दाखवावा लागणार आहे. सुरुवातीला विद्यमान नगरसेवकांनी आपले नगरसेवक पद अबाधित राखण्यासाठी आजूबाजूच्या प्रभांगामध्ये आपला चेहरा दाखवायला सुरुवात केली होती. तोच प्रकार आता इच्छुकांना करावा लागणार आहे.

महापालिकेची आगामी निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. बहुसदस्यीय पद्धत निवडणुका झाल्यास १११ प्रभागांचे फक्त ३७ प्रभाग होतील. तसेच प्रभागरचना, आरक्षण व सर्वच प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निर्देश आले नाहीत. जसे निर्देश प्राप्त होतील त्याप्रमाणे सर्व प्रक्रिया करण्यात येईल.

  – अमरीश पटनिगिरे, उपायुक्त व निवडणूक अधिकारी