सध्याच्या काळात ताण सर्वानाच आहे. आपापल्या क्षमतेनुसार कामाची निवड करणे, त्यानुसार जीवनक्रम आखणे आणि स्वत:चे आरोग्य आणि मनाच्या समाधानासाठी विरंगुळा शोधतो. आजूबाजूचे वातावरण प्रफुल्लित असले की आपोआप टवटवीतपणा येतो. कोपरखैरणे येथील ‘फाम’ गृहनिर्माण संस्थेत तोच अनुभव मिळत आहे. संस्थेच्या प्रवेशद्वारावरून आत जाताच हिरवाईने नटलेले भलेमोठे उद्यान स्वागत करते. उद्यानात पाऊल टाकताच प्रत्येकाला आपापल्या परीने विरंगुळा शोधतात. या संकुलात सर्व वयातील रहिवासी पद्धतीने विरंगुळा शोधतात. काहींचा वीकेण्ड विरंगुळाही संस्थेच्या आवारातच घालवितात, हे विशेष!

नवी मुंबईतील सर्वात मोठी सोसायटी म्हणून ‘फाम’ सोसायटीचा नावलौकिक आहे. ६४ हजार चौरस मीटर या क्षेत्रफळावर वसलेल्या संकुलात एकूण ४७ इमारती, १५०८ सदनिका आणि ५८ व्यावसायिक गाळे आहेत. मुंबईतून नवी मुंबईत स्थलांतर झालेल्या व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना म्हणजे व्यापाऱ्यांच्या भाषेत गुमास्तांना घरे मिळावीत, यासाठी या सोसायटीची स्थापना करण्यात आली होती, परंतु कालांतराने इतर नागरिकांना या सोसायटीमध्ये घरे घेण्यास परवानगी देण्यात आली होती. येथे नेपाळपासून ते कन्याकुमारी, हिमाचल प्रदेश तसेच कच्छ ते अरुणाचल प्रदेश अशा अनेक प्रांतातील नागरिक वास्तव्यास असल्यामुळे येथील नागरिक फामला ‘मिनी इंडिया’ म्हणून संबोधतात. सणांची पर्वणी ही सर्व संकुलात असते, पण या संकुलाच्या सणांमधून नेहमीच रहिवाशांच्या कलागुणांना वाव दिला जातो. इतकेच नाही तर हे गेले दहा ते बारा वर्षांपासून सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबविताना खंड न पाडता वर्षांनुवर्षे त्याच पद्धतीने साजरे करतात.

सर्वधर्मसमभाव असल्याने पोंगल, लोरी, माता की चौकी असे सणदेखील साजरे होतात. नवरात्रीत मुलींना ‘कन्यासन्मानाने गौरविण्यात येते. गणेश उत्सवामध्ये विध्यार्थाना ‘सरस्वती सन्मान’ दिला जातो. सरस्वती सन्मान विद्या शिकणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देण्यासाठी देण्यात येत असल्याचे सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले. तसेच लहान मुले व ज्येष्ठांसाठी जलद चालण्याची स्पर्धा आणि इतर रहिवाशांसाठी क्रीडा महोत्सव साजरा केला जातो. या क्रीडा महोत्सवात फुटबॉल, बुद्धिबळ, कॅरम, व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन आदी खेळ खेळले जातात. या स्पर्धेत ज्येष्ठही तेवढय़ाच जोमाने स्पर्धेत सहभागी होत असतात. क्लब हाऊसमध्ये जिम, जलतरण, कॅरम रूम, ज्येष्ठांसाठी वेगळी खोली उपलब्ध करून देण्यात आली आहे. या क्लब हाऊसमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र वेळ देण्यात येते.

या संकुलात जास्त कुटुंबीयांची संख्या असल्याने येथे पार्किंगची समस्या भेडसावत होती; मात्र दीड किलोमीटर सोसायटी आवाराच्या सभोवताली चार चाकीसाठी ९०० तर दुचाकीला एक हजार क्षमतेची पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.

वृक्ष संवर्धन

नियोजनबद्ध काम केले तर कमी जागेत खूप काही करता येते, याचा प्रत्यय या फाम संकुलात येतो. इमारतीच्या आवारात मोठे वृक्ष तसेच विविध शोभिवंत झाडे आहेत. येथे एक मुख्य उद्यान आणि चार छोटी उद्याने आहेत. यातील मुख्य उद्यानाला दोन वेळा उत्तम उद्यानाचा पुरस्कार मिळाला आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने २०१३ ला प्रथम तर २००७ मध्ये तृतीय स्थान मिळाले होते. नारळ, अशोक, वेगवेगळ्या फुलझाडांचे संवर्धन करून उद्यान हिरवळीने भरले आहे. उद्यानात झोपडीसारखी रचना करून शेड बांधण्यात आली आहे. या शेडमध्ये महिला रोज सायंकाळी भजन करतात. तसेच मुलांच्या खेळाची साधने, जॉगिंग ट्रॅक तसेच खुले नाटय़गृह उपलब्ध आहे. सायंकाळी एक ज्येष्ठ रोज न चुकता या उद्यानात रेडिओवरील जुनी गाणी मोठय़ा आवडीने ऐकत बसतात.

अनाथांचा एक दिवस

दहा वर्षांपासून अनाथ मुलांना या संकुलात एक दिवस मनमोकळे बागडण्यासाठी प्रवेश दिला जातो. दिवसभरात त्यांना सगळ्या सुविधा पुरवल्या जातात. या उपक्रमामुळे अनाथ मुलांना एक दिवस वेगळ्या वातावरणात वावरता येते आणि समाजासाठी काहीतरी केल्याचे समाधान येथील रहिवाशांना मिळते.

संकुलाची वैशिष्टय़े

  • १०० तुळशीविवाह एकाच वेळी पार पडतात. जास्त लोकवस्ती असलेल्या गृहसंस्थेत १७ सदस्यांची एक समिती कारभारावर लक्ष ठेवून असते.
  • ४८ सुरक्षारक्षक तैनात आले आहेत. संस्थेच्या आवारात ४५० एलईडी बल्ब लावून ऊर्जा बचत केली जाते.
  • फाम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कोपरखैरणे

पूनम धनावडे