नेरुळमध्ये जेट्टीचे बांधकाम सुरू; हॉवरक्राप्ट टॅक्सी सेवा जुलैपासून

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई</strong>: नवी मुंबई  ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ‘रो पॅक्स’ ही जलवाहतूक सेवा फेब्रुवारीमध्ये उपलब्ध होणार आहे. तर हॉवरक्राप्ट टॅक्सी सेवा जुलैपासून उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या वॉटर टॅक्सीची सध्या चाचणी सुरू आहे.

सिडको, बीपीटी आणि मेरीटाईम बोर्डाच्या वतीने ही सेवा सुरू करण्यात येत आहे. नेरुळ येथील एनआरआय संकुलाजवळ जलवाहतुकीसाठी जेट्टीचे बांधकाम सुरू आहे.

२० वर्षांपूर्वी वाशी ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान सुरू असलेली हॉवरक्राप्ट सेवा पुन्हा सुरू  करण्याच्या दृष्टीने सिडको, मेरीटाईम बोर्डाची चाचणी सध्या सुरू आहे. बेलापूर ते भाऊचा धक्का यादरम्यान  ही सेवा चालणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईच्या वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बेलापूर ते भाऊचा धक्का या दरम्यान चालणारी ही सेवा नंतर नेरुळ, वाशी, ऐरोली, आणि नियोजित नवी मुंबई विमानतळ दरम्यान विकसित केली जाणार आहे. या जलवाहतुकीने केवळ २० ते २२ मिनिटांत मुंबई गाठता येणार आहे. या हॉवरक्राप्ट सेवेची क्षमता १० ते २५ प्रवाशांची राहणार आहे. सहा वॉटर टॅक्सी ऑपरेटरनी ही सेवा सुरू करण्यासाठी रस दाखविला आहे. हॉवरक्राफ्ट  सेवेदरम्यान प्रवाशांबरोबरच वाहनांची वाहतूक करणारी ‘रो पॅक्स’ सेवा फेब्रुवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सूत्रांनी व्यक्त केली.

‘रो पॅक्स’ सेवेत एकाच वेळी १२० वाहनांची वाहतूक केली जाणार आहे. नवी मुंबई आणि मुंबईतून मांडवा अलीबागपर्यंत ही सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी लागणारी जेट्टी सिडको, मेरीटाईम बोर्ड आणि बीपीटी मिळून नेरुळ येथे बांधत आहे.  या दोन सेवांमुळे रस्ते वाहतुकीवर  पडणारा वाहनांचा ताण कमी होणार आहे.

‘रो पॅक्स’ वाहतुकीची चाचणी सध्या सुरू असून ही सेवा फेब्रुवारी मार्च दरम्यान सुरू केली जाणार आहे. तर हॉवरक्राफ्ट सेवा जुलैपर्यंत सुरू होणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारी ही एक जलद सेवा ठरणार असून महामार्गावरील वाहनांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

-संजय भाटिया, अध्यक्ष मुंबई पोर्ट ट्रस्ट

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ferry service from mumbai to navi mumbai will start february zws
First published on: 11-01-2020 at 03:10 IST