फुटबॉल स्पर्धेसाठी उड्डाणपुलांचे सुशोभिकरण

शहरातील उड्डाणपुलांखाली बेकायदा बांधण्यात आलेल्या वाहतूक पोलीस चौक्या व अनधिकृत वाहनतळ तात्काळ हटविण्याचे आदेश एमएसआरडीसी, एमएमआरडीए आणि पालिकेने दिले आहेत. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फिफा फुटबॉल स्पर्धेसाठी पालिकेने शीव-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाखालील जागा सुशोभित करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईत रस्ते विकास महामंडळाच्या आधिपत्याखाली येणाऱ्या शीव-पनवेल महामार्गावर वाशी, सानपाडा, तुर्भे, शिरवणे, नेरुळ, सीबीडी आणि बेलापूर खिंडीजवळ वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून उड्डाणपूल बांधले आहेत. याच वेळी महापे शिळफाटा मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून एमएमआरडीएने महापे येथे एक उड्डाणपूल बांधलेला आहे. सिडकोने औद्योगिक व नागरी वसाहतींना जोडण्यासाठी महापे येथे एक उड्डाणपूल उभारलेला आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात असे नऊ उड्डाणपूल आहेत. यातील वाशी, महापे, तुर्भे, सीबीडी या उड्डाणपुलांच्या खाली वाहतूक पोलिसांनी आपला डेरा टाकलेला आहे तर नेरुळ, सानपाडा, बेलापूर, तुर्भे येथे बेकायेदशीर वाहनतळ उभारण्यात आलेले आहेत. यात अनेक ठिकाणी बेवारस वाहने ठेवण्यात आलेली आहेत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव  देशमुख यांनीही उड्डाणपुलाखाली कोणत्याही प्रकारचे बांधकाम व वाहनतळांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश स्थानिक प्राधिकरणांना दिले होते; मात्र त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली गेलेली नाही. मुंबई उच्च न्यायालयानेही राज्यातील कोणत्याही उड्डाणपुलाखाली बांधकामे करण्यात येऊ नयेत, असे आदेश दिले आहेत. नवी मुंबईतील उड्डाणपुलांखाली मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली आहेत. यात वाहतूक पोलिसांच्या चौक्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ही सर्व बांधकामे हटवावीत, असे आदेश एमएसआरडीसी व एमएमआरडीएने दिले आहेत.

हे उड्डाणपूल सुशोभीकरणासाठी हस्तांतरीत करण्यात यावेत, अशी मागणी नवी मुंबई पालिकेने या दोन्ही प्राधिकरणांकडे केली आहे. ऑक्टोबरमध्ये नवी मुंबईत १९ वर्षांखालील फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा होणार आहे. देश विदेशातील लाखो प्रक्षेक नवी मुंबईत येणार आहेत. त्या वेळी नवी मुंबईची प्रतिमा उजळावी यासाठी शीव-पनवेल महामार्गावरील सर्व उड्डाणपूल सुशोभित केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चौक्या हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार कोणत्याही उड्डाणपुलाच्या खाली बांधकामांना बंदी आहे. त्यामुळे ज्या प्राधिकरणांनी उड्डाणपुलांचे बांधकाम केले आहे, त्यांनी पुलांखाली करण्यात आलेल्या सर्व बांधकामांना नोटीस बजावली आहे. नवी मुंबई पालिका या जागा आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी सुशोभित करणार आहे.

– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका