नवी मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः भाजीपाल्याचे उत्पादन खराब झाल्याने बाजारात पुरवठा घटला आहे. यामुळे स्थानिकच नव्हे, तर परदेशी भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. एपीएमसीतील भाजीपाला व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, काही परदेशी भाज्यांचे दर दुप्पट झाले असून, काहींचे दर प्रतिकिलो शंभर रुपयांच्या पुढे गेले आहेत.
सध्या बदलत्या जीवनशैली आणि आहार पद्धतीमुळे नागरिक परदेशी भाज्यांकडे वळले असून, ब्रोकोली, झुकीनी, बेलपेपर, मशरूम, आईसबर्ग लेट्यूस यांसारख्या भाज्यांना मोठी मागणी असते. या भाज्यांचा वापर प्रामुख्याने पिझ्झा, पास्ता, सूपसारख्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, पुरवठा घटल्यामुळे या भाज्यांचे दर झपाट्याने वाढले आहेत.
या परदेशी भाज्यांचा मुख्य पुरवठा बंगळुरूहून मुंबई एपीएमसी बाजारात होतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या मालाला पुरेसा उठाव मिळालेला नाही. बाजारात यापूर्वी आलेला भाजीपाला पडून राहिल्याने आणि पावसामुळे वाहतुकीतील अडथळे व खराब रस्त्यांमुळे बंगळुरूहून होणारा पुरवठा कमी झाल्याचे चित्र आहे. परिणामी, मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दरवाढीचा सर्वाधिक फटका शहरी भागातील ग्राहकांना बसत असून, हॉटेल, रेस्टॉरंट तसेच फास्टफूड उद्योगालाही याचा परिणाम जाणवत आहे.
‘भाज्या खरेदी करण्याऱ्या ग्राहकांची संख्या रोडावली आहे. तसेच, पावसामुळे वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. यामुळे दर वाढले असून, हीच परिस्थिती राहिली तर येत्या काळात हे दर आणखी वाढू शकतात,’ अशी माहिती एपीएमसीतील भाजीपाला व्यापारी राहुल वैश्य यांनी दिली.
मागील आठवड्यातील आणि सध्याचे दर (प्रतिकिलो):
भाजी – मागील आठवड्यातील दर — सध्याचा दर
ब्रोकोली – १००-१५० — २५०-३००
झुकिनी – ५०-६० — ८०-१००
रेड कॅबेज – १०-२० — ४०
चेरी टोमॅटो – १०० — २५०
आईसबर्ग लेट्युस – ३०-४० — २००-३००
आता नागरिकांना परदेशी भाज्यांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार असून, दर काही काळासाठी स्थिर होण्याची शक्यता कमीच असल्याचे बाजारातील स्थितीवरून स्पष्ट होत आहे.