नवी मुंबई: सट्टा बाजारात आमच्या मार्गदर्शखाली पैसे गुंतवा कमी कालावधीत भरघोस परतावा मिळवा, किंवा आमच्या व्हिडीओला लाईक कमेंट करा आणि पैसे कमवा अशा फसव्या जाहिरातींना बळी पडून रोज कोट्यवधी रुपयांची फसवणूक समोर येत आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारने मोबाईल वर जनजागृतीतपर कॉलर ट्यून लावली तरीही नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. असाच प्रकार नवी मुंबईत घडला असून एका व्यक्तीने सट्टा बाजारासाठी २७ लाख २५ हजार ८७० रुपये गुंतवले मात्र एक छदाम त्यांना परतवा मिळाला नाही आणि गुंतवणूक रक्कमदेखील परत मिळाली नाही.
यातील फिर्यादी हे नवी मुंबईतील नेरुळ येथे आर्मी कॉलनीत राहणारे एक जेष्ठ नागरिक आहेत. सट्टा बाजारात पैसे गुंतवा आणि कमी कालावधीत भरघोस परतावा मिळवा अशा आशयाची जाहिरात त्यांनी समाज माध्यमात पहिली. त्यावर क्लीक केले असता त्यांचा समावेश एका व्हॉटसअॅप समूहात झाला ज्याचे अॅडमिन दिव्यांगांना थोरात नावाच्या महिला होत्या.
तेथे अप स्टॉक्स नावाचे अॅप डाऊन लोड करण्यास सांगितल्या प्रमाणे फिर्यादी यांनी केले त्या द्वारे विविध पाच जणांनी सांगितल्या प्रमाणे गुंतवणूक केली. त्याचे पैसे संशयित व्यक्तींनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी दिलेल्या विविध बँक खात्यात वळते केले. अॅप वर भरघोस परतवा दिसत होता मात्र फिर्यादी यांच्या खात्यात वळती होत नव्हता.
४ मे ते १४ मे या दहा दिवसात फिर्यादी यांनी २७ लाख २५ हजार ८७० रुपये गुंतवले मात्र एक रुपयादेखील त्यांना परतवा मिळाला नाही आणि गुंतवणूक रक्कम हि परत मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी या प्रकरणी गुरुवारी नेरुळ पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.