शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनचालकांची कसरत, तर एमआयडीसीत जीवघेणा प्रवास

नवी मुंबई नवी मुंबईतील शीव-पनवेल महामार्गाची डागडुजी हा एवढाच मुद्दा सध्या गाजत असला तरी शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीयच आहे. जुलैपासून कोसळणाऱ्या पावसात रस्त्यांमध्ये पडलेले खड्डे पालिका प्रशासनाने पेव्हर ब्लॉक टाकून बुजवले गेले आहेत. परंतु ही फरसबंदी काही उपयोगाची नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, ठाणे-बेलापूर पट्टय़ातील औद्यागिक वसाहतीतील रस्त्यांची अवस्था तर कोरडय़ा पडलेल्या नाल्यांच्या पात्रासारखी झाली आहे. या खाचखळग्यांतूनच वाहनांना ये-जा करावी लागत आहे.

नवी मुंबई एमआयडीसीतील केवळ उड्डाणपुलांनाच नाही तर रस्त्यांनाही वाली नसल्याचे विदारक चित्र आहे. एमआयडीसीतील रस्त्यांची सर्वात दयनीय अवस्था महापे, घणसोली परिसरात दिसून येते.  पावणे औद्योगिक क्षेत्राकडून महापे औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. येथील काही खड्डे जवळपास एक फूट खोल असून पावसाळय़ात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत. महापेमधील इलेक्ट्रॉनिक झोन परिसरातील रस्त्यांवर तर फूटभर भागही सपाट दिसणार नाही, अशी अवस्था आहे. उरण येथून कल्याण, शीळच्या दिशेने मार्गक्रमण करणारी मालवाहू वाहने येथून ये-जा करत असतात. मात्र, खड्डय़ांमुळे या वाहनांचा वेग कमालीचा मंदावतो. त्याचा परिणाम वाहतूक कोंडीतही होतो.

महापालिकेच्या हद्दीतील अंतर्गत रस्त्यांवरही अद्याप अनेक ठिकाणी खड्डे दिसून येतात. यंदा पाऊस लांबल्याने खड्डेभरणीची कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही शहरातील सेक्टरअंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात झालेली नाही. विशेष म्हणजे,  नवी मुंबई महापालिकेचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी अभियंता विभागातील अधिकाऱ्यांना शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. तरीही आयुक्त निवासाकडून दारावे गावाकडे जाणारा रस्ता, नेरुळ डेपोसमोरील रस्ता, शिरवणे भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूकडील अंतर्गत रस्ता तसेच सानपाडा रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर  खड्डे दिसून येत आहेत.

नवी मुंबई मनपा एमआयडीसीतुन मालमत्ता कर वसूल करीत असल्याने पायाभूत सुविधांची जवाबदारी त्यांचीच आहे.

-एम. एस. कळकुटकी, कार्यकारी अभियंता एमआयडीसी

शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे दिसत नसले तरी काही भागातील अंतर्गत रस्त्यावर मात्र खड्डे आढळून येत आहेत.ते पालिकेने तात्काळ बुजवण्यात यावेत.

 दिनेश मिश्रा,रहिवाशी नेरुळ