घाऊक बाजारात आवक कमी झाल्याने दरवाढ

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात सध्या फळांची आवक घटली आहे. त्यात नियमनमुक्ती असल्याने शेतकरी थेट विक्री करीत आहेत. त्यामुळे फळ बाजारात आवक कमी झाली आहे. मात्र गणेशोत्सव असल्याने फळांना मागणी वाढली आहे. याच्या परिणामी फळांचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात फळांच्या दरात २० ते ३० टक्के वाढ दिसत आहे, तर किरकोळ बाजारात त्याच्या तीनपट दर आकारले जात आहेत.

वाशीच्या घाऊक बाजारात सफरचंद, डाळिंब, मोसंबी, सीताफळ या फळांची सध्या मागणी वाढली आहे. मात्र नियमितपेक्षा ४० टक्के आवक घटली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच गणेशोत्सव काळात फळांचे बाजारभाव चढेच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

फळ बाजारात सीताफळ, सफरचंद या फळांची आवक सुरू झाली आहे. त्याचबरोबर पेरची आवकही होत आहे. मंगळवारी बाजारात १० गाडय़ा फळांची आवक झाली आहे. घाऊक बाजारात १५ ते २० किलो पेरला ३०० ते १२०० रुपये दर आहेत. पावसाळ्यात सफरचंद, सीताफळ या फळांची आवक जास्त असते. त्यामध्ये हिमाचलमधील शिमला सफरचंद बाजारात दाखल होताच भाववाढ होत असते.

गणेशोत्सवात केळीला अधिक मागणी असते. जळगाव, धुळे येथून केळीची आवक होत असून, त्याचा घाऊक बाजार भायखळा येथे आहे. किरकोळमध्ये केळीला प्रति डझनला ४० ते ६० रुपये दर आहेत.

किरकोळीत लूट

फळ बाजारात घाऊक दराने फळे उपलब्ध होत असतात, मात्र तेच किरकोळ बाजारात वाहतूक, गाळे भाडे खर्च ही सबब पुढे करून फळांच्या विक्रीतून तिप्पट ते चौपट दर आकारले जात आहेत.

नियमनमुक्तीमुळे आवक कमी

केंद्र शासनाने फळे, भाजीपाला, डाळी, कडधान्ये यावरील नियमनमुक्ती उठवल्याने बहुतांश शेतमाल थेट उपनगरात पाठवला जात आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात शेतमाल कमी दाखल होत असून आवक घटत आहे. नियमनमुक्तीआधी बाजारात फळांच्या ५० ते ६० गाडय़ा दाखल होत होत्या. तेच आता २० ते २५ गाडय़ा आवक होत आहे.

फळांचे घाऊक व किरकोळीतील दर

  • काश्मिरी सफरचंद :  घाऊक बाजारात २० ते २५ किलोला १५०० ते ३००० रुपये दर आहेत, तर किरकोळ बाजारात प्रति किलो १५० ते २०० रुपये दर आहेत.
  • डाळिंब  : घाऊक बाजारात ७० ते २०० रुपयांना असलेल्या डाळिंबाला किरकोळ बाजारात १५० ते २०० रुपये दर आहेत.
  • सीताफळ : घाऊक बाजारात (प्रति किलो) दर ४० ते १५० रुपये असून किरकोळ बाजारात १०० ते १५० रुपये किलोने विकले जात आहेत.

वाशी एपीएमसीमध्ये नियमनमुक्ती उठवल्याने बाजारात ३५ ते ४० टक्के शेतमालाची आवक कमी झाली आहे. आता गणेशोत्सव सुरू होत असून किरकोळ विक्रेत्यांकडून बाजारात फळांची मागणी वाढत आहे. सध्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. मात्र किरकोळ बाजारात कोणाचेही नियंत्रण नसल्याने चढय़ा दराने फळांची विक्री होत असते.

– संजय पिंपळे, व्यापारी, एपीएमसी