गांधी जयंतीचे निमित्त साधत पालिकेच्या  सफाई कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी नियम न पाळणाऱ्या नागरिकांना मुखपट्टी व गुलाब देत गांधीगिरी केली. करोनाविषयक जनजागृतीसाठी तुर्भे विभाग कार्यालयाच्या वतीने हा पुढाकार घेण्यात आला.

लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुम्ही गर्दी करणार, त्या त्या ठिकाणी करोनाचा धमाका होणार, तिसरे महायुद्ध करोनामुळे, घरात थांबा इतिहास घडेल, बाहेर जाल, इतिहास व्हाल, भीड मत ‘करो’ना! आशा विविध आशयाचे फलक घेत सफाई कामगारांनी सानपाडा येथील मोराज सर्कल, वाशीतील आरेंजा कॉर्नर, अन्नपूर्णा चौक, माथाडी चौक, जलाराम चौक या गर्दीच्या ठिकाणी मानवी साखळी करीत जनजागृती केली.

तुर्भे विभाग अधिकारी सुबोध ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छता अधिकारी सुधाकर वडजे यांच्या मदतीने विभागातील सफाई कामगारांनी ज्या नागरिकांनी मुखपट्टी न घातलेल्यांना मुखपट्टीचे वाटप केले. तसेच गुलाबाचे फूल देत करोना नियंत्रणासाठी नियम पाळा असे आवाहन केले. विविध दुकान मालकांनाही याबाबत नियमावली पाळण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

महा पालिकेचे साफ सफाई कामगार टाळेबंदीच्या काळातही गेली सहा महिने आपले कर्तव्य बजावत होते. गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियानाला शहरात सुरुवात करण्यात आली असून शहर प्रथम क्रमाकावर येणयासाठी त्यांच्यावरच सर्व मदार असणार आहे. आशा परिस्थिती त्यांच्याकडून गांधी जयंतीनिमित्त करोना जनजागृतीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे नवी मुंबईकरांनीही स्वागतच केले आहे.

गांधी जयंतीनिमित्त नागरिकांनी करोनाचे नियम पालन करण्यासाठी कामगारांनी गांधीगिरी केली. करोना संपला नाही, धोका कायम आहे हे सांगत नियम पाळण्याचे आवाहन केले.

-सुबोध ठाणेकर, विभाग अधिकारी, तुर्भे सानपाडा.