विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचे भक्तांना शांततेचे आवाहन

पोलिसांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी, विसर्जनादिवशी नागरिक आणि पोलीस यांच्यातील सुसंवादाच्या भूमिकेला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. गणेशभक्तांनी विसर्जनादिवशी मिरवणुकीत उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ढोल-ताशे तसेच डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा पाळताना पोलीस आणि भक्तांनी कायद्याने आखून दिलेली ‘लक्ष्मणरेषा’ न ओलांडण्याचे सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. पनवेलचे साहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडे विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. गेल्या वर्षी गणेशोत्सव, दहीहंडी आणि नवरात्रोत्सवात संपूर्ण मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सर्वाधिक ध्वनिप्रदूषणाचे खटले दाखल करण्यात आले होते.

पोलिसांच्या आकडेवारीनुसार पनवेलमधील विविध परिसरात गुरुवारी शंभर सार्वजनिक आणि १३०० हून अधिक खासगी गणेश विसर्जन होईल.

  • यंदा अनंत चतुर्दशीला पनवेल शहरातून २२, तालुका पोलीस ठाण्याच्या परिसरातून २, कळंबोली येथून १२, तळोजा परिसरातून ४, खारघर परिसरातून सर्वाधिक २४, कामोठे येथून १८ आणि खांदेश्वर परिसरातून १९ असे सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. विसर्जनस्थळी काही ठिकाणी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन निर्माल्य एकत्रित करण्याची सोय केली आहे. काही विसर्जनस्थळांवर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक कोळीबांधवांना एकत्र करून भव्य गणेशमूर्तीचे सुरक्षितपणे विसर्जित करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा अवमान करणाऱ्या आयोजकांविरोधात कारवाईचा प्रस्ताव न्यायालयाकडे पाठविला आहे.

Untitled-18