नवी मुंबई : राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि माझा व्यक्तीगत वाद असेलही मात्र तो कुणामुळे आहे याचा सर्वांनी विचार करावा. गणेश नाईक हे माझे नेते आहेत आणि मी त्यांना नेते मानत नाही अशातला भाग नाही. ते माझ्या अगोदर राजकारणात आले आहेत. एकेकाळी त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम केले आहे. त्यांच्या निवडणुकीसाठी रात्रीचा दिवस केला. त्यांच्याशी माझा वाद नाही. जो वाद आहे तो त्यांच्या ठराविक कार्यकर्त्यांमुळे आणि त्यांना आमदारकीच्या बोहल्यावर चढविणाऱ्यांमुळे, अशी जोरदार टोलेबाजी करत बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी नाईक यांच्याशी असलेल्या त्यांच्या मतभेदांवर जाहीर भाष्य केले.
भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डाॅ. राजेश पाटील यांचा पदग्रहण समारंभ गुरुवारी रात्री उशीरा शिरवणे परिसरात संपन्न झाला. यावेळी मुख्य वक्त्या म्हणून उपस्थित असलेल्या आमदार म्हात्रे यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. डाॅ.पाटील हे नवी मुंबईतील मंदा म्हात्रे यांच्या गटातील मानले जातात. त्यामुळे त्यांच्या पदग्रहण समारंभास उपस्थित असलेल्या म्हात्रे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ‘गणेश नाईक आणि माझ्यात व्यक्तीगत वाद असेलही मात्र तो कुणामुळे आहे हे सर्वांना माहीत आहे. डाॅ.पाटील अध्यक्ष झाले तेव्हा मी त्यांना म्हणाले आधी गणेश नाईक यांना भेटायला जा. ते आज नाही भेटले तर त्यांना उद्या भेटा. ते नेते आहेत. नेते हे नेतेच असतात. त्यांना आपण नेते मानायलाच हवे. मी काय त्यांना नेते मानत नाही अशातला भाग नाही. तुम्हाला तसं वाटतं. ते माझ्या अगोदर राजकारणात आहेत. मी त्यांच्या नंतर आलेली आहे. पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी कामही केलेले आहे. त्यांच्या निवडणुकीसाठी मी रात्रीचा दिवस केलेला आहे. तुम्हा नवीन कार्यकर्त्यांना हे माहीती नाही, असे आमदार म्हात्रे यावेळी म्हणाल्या.
भाजपचे माझ्यावर उपकार
भारतीय जनता पक्षाचे कधी उपकार मी विसरू शकत नाही. आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणीस यांनी २०१४ मध्ये तर मला तिकीट दिले. त्यावेळी त्यांनी सांगितलं तुम्ही कशा निवडून याल. मी म्हणाले निवडून नाही आली, तर परत कधी पद मागायला मी येणार नाही. दुसऱ्यावेळी सगळे आले, त्यावेळीही साहेबांनी मला तिकीट दिले. आता सुद्धा बरेच लोक गेले होते उमेदवारी मागण्यासाठी. जे नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकत नाहीत ते सुद्धा आमदारकीच्या शर्यतीत होते. त्यावेळी देखील वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी आयुष्यभर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे हे उपकार विसरु शकत नाही, असे त्या म्हणाल्या. मी राष्ट्रवादीत असताना यांनी मला गटारात टाकले होते. मी विधान परिषदेवर चांगले काम केले होते. मी कधी भारतीय जनता पार्टीची गद्दारी केली नाही. मी जिथे जिथे राहिली तिथे प्रामाणिक राहिली. मला मानत नाही म्हणून विरोध करायचा हे कधी मी केले नाही, असे त्या म्हणाल्या.
सदीप नाईकांवर टिका
पक्षाचे माजी अध्यक्षांना मी विधानसभा निवडणुकीवेळी सांगितले तुम्ही यावेळी थांबा. तुमचे भविष्य उज्वल् आहे. तुम्ही तरूण आहात. आज तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, उद्या तुम्हाला विधान परिषदेवर घेतील. पण त्यांना मी नकोच होती. भारतीय जनता पक्षामध्ये खूप लोक विचारवंत आहेत. आजही त्यांना पद नाही आहे. आजही ते काम करत आहेत. अनेक कार्यकर्ते वर्षोंवर्ष काम करतात आणि त्यात त्यांनी आपल्याला निवडले आपण किती मोठे भाग्यवान आहोत, असे त्या यावेळी म्हणाल्या.