नवी मुंबई : नवी मुंबईतील लोटस तलाव वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी सलग सात आठवडे प्रत्येक रविवारी एकत्र येत आंदोलन केले होते. त्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांची वाशी येथील जनता दरबारात २६ जून रोजी भेट घेत पर्यावरणप्रेमींनी लोटस तलाव वाचवण्यासाठी निवेदन दिले होते. नाईक यांनी निवेदनाची तत्काळ दखल घेत सिडकोने लोटस तलावात टाकलेला राडारोडा काढून टाकावा अन्यथा पालिकेने सिडकोविरोधात एफआरआय दाखल करावा, असे आदेश नवी मुंबई महापालिकेला दिले होते. परंतू याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

पर्यावरणप्रेमींनी वारंवार मागणी करुनही अद्याप तलावातील भराव सिडकोने काढला नाही. सिडकोच्या पर्यावरणविरोधी कृतीचा निषेध करत सलग सात आठवडे रविवारी विविध पर्यावरणवादी संस्था, कार्यकर्ते, नागरिक, लोकप्रतिनिधी एकत्र येत लोटस तलाव वाचवण्याचा निर्धार करत असताना सिडको याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. वनमंत्र्यांच्या आदेशालाही पालिका व सिडको जुमानत नसल्याचे चित्र आहे.

‘पर्यावरणप्रेमींनी पर्यावरण टिकवा, लोटस लेक वाचवा’ अशा घोषणा देत तलावाभोवती आंदोलन केले. विष्णुदास भावे नाट्यगृह येथे झालेल्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारातही पर्यावरणप्रेमींनी लोटस तलाव वाचवण्यासाठी निवेदन दिले होते. त्यानंतरही सिडकोने अद्याप तलावात टाकलेला भराव काढला नाही. तर दुसरीकडे पालिकेने याबाबत सिडको विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या वनमंत्र्यांच्या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाशीतील जनता दरबारात २६ जून रोजी निवेदन दिले, त्यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार उपस्थित होते. त्यावेळी नाईक यांनी सुनिल पवार यांना आदेश दिले की सिडकोला तात्काळ टाकलेला भराव काढण्याचे आदेश द्या आणि अन्यथा सिडकोच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. परंतु नाईकांच्या आदेशानंतर काही झाले नाही. लोटस तलावात टाकलेला भराव तसाच पडून आहे. संतोष करकरे, पर्यावरणप्रेमी