नवी मुंबईत मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने वाहनचालकांची दाणादाण उडवली. दुपारनंतर पावसाने चांगलाच जोर धरल्याने  ठाणे-बेलापूर मार्गावर, तसेच महापे शीळफाटा मार्गावर चालकांना  दिवसाही मुख्य दिवे लावून प्रवास करावा लागत होता.  ठाणे वाशी हार्बर मार्गावरील लोकल दहा मिनिटे उशिराने धावत होत्या.

रस्त्यावर जागोजागी काही ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहने चालविण्यासाठी चालकांना कसरत करावी लागत होती.  काही ठिकाणी पावसामुळे वाहतूक सिग्नल बंद पडल्यामुळे कोंडी झाली होती.

ठाणे-बेलापुर मार्गावरील पावसामुळे सिग्नल जनित्र बंद पडल्यामुळे तसेच  आणखी एका जनित्रात बिघाड झाल्याने सिग्नल चुकीच्या वेळी सुरू व बंद होत होते. याचाही फटका वाहतुकीला बसला.  घणसोली, सविता केमिकल या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ता अंरुद असल्याने वाहतुककोंडीत भर पडली. कोंडी सोडविण्यासाठी वाहतुक शाखेच्या पोलिसांना कसरत करावी लागली. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे वृक्ष कोलमडून पडण्याच्या घटना घडल्या. शनिवार पासून आतापर्यंत १७ झाडे उन्मळून पडण्याची घटना नवी मुंबईत घडल्या आहे. भुयारी मार्गामध्ये पाणी साचत असलेल्या वाहने बंद पडण्याच्या घटना मध्ये वाढ होत आहे.  रिक्षा चालक देखील प्रवाशांच्या घाईचा गैरफायदा घेत वाढीव भाडे सांगत आहेत. त्यामुळे प्रवाशाना यांचा आर्थिक भुर्दड सहन सोसावा लागत आहे.