पेण येथील हेटवणे धरणातून महामुंबईच्या अध्र्या भागाला पाणीपुरवठा करणारे पाच पंप पंधरा वर्षांच्या सेवेनंतर कुचकामी झाले असून त्यातून होणारा पाणीपुरवठा हा अत्यंत कमी दाबाने होत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. कमी दाबाने येणाऱ्या या पाण्याचा सर्वाधिक फटका हा खारघर, कामोठे भागांतील रहिवाशांना बसला असून येथील पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात एक नोव्हेंबरपासून सिडकोने वीस टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतल्याने रहिवाशांच्या काळजात धडकी भरली आहे.
नवी मुंबईपासून ४८ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेण तालुक्यात सिडकोने वीस वर्षांपूर्वी हेटवणे धरण बांधले आहे. नवी मुंबईतील पाण्याची गरज भागविण्यासाठी सिडकोने बांधलेल्या या धरणाचा मोरबे धरणामुळे विसर पडला आहे. जलवाहिनी टाकण्यात आलेल्या मार्गातील गावांना पाणीपुरवठा केल्यानंतर शिल्लक राहिलेले पाणी नवी मुंबईत येत आहे. सिडकोने एप्रिल १९९४ रोजी दिघा ते सीबीडी हे १०८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ पालिकेला हस्तांतरित केले. त्यानंतर चार वर्षांत पालिकेने खालापूर येथील जलसंपदा विभागाचे अर्धवट स्थितीतील मोरबे धरण विकत घेतल्याने नवी मुंबईतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. त्यामुळे सिडको मोरबे धरणातील ५० दशलक्ष लिटर पाणी विकत घेत असून हेटवणे धरणातील ५२ दशलक्ष लिटर पाणी कामोठे, खारघर, उलवा, कळंबोली, नवीन पनवेल या भागांतील रहिवाशांना पुरवठा करीत आहे. खारघरमधील अनेक सोसायटय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब असून काही सोसायटी टँकरच्या पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहेत. त्यामुळे उन्हाळ्याअगोदरच्या या पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या रहिवाशांनी नुकताच सिडको कार्यालयावर मोर्चा नेऊन येथील जल अभियंत्यांना जाब विचारला. त्यात पावसाने या वर्षी ओढ घेतल्याने सर्वच प्राधिकरणांना पाणी काटकसरीचे तंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. सिडकोने १ नोव्हेंबरपासून वीस टक्के पाणीकपात जाहीर केल्याने ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ असा प्रकार झाल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत. हेटवणे येथे असलेले पाच पंप पंधरा वर्षांपूर्वीचे असल्याने त्यांची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे या शहरांना उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याची बाब सिडको अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे, पण सिडको प्रशासन हे पंप बदलण्याच्या दृष्टीने कोणत्याच हालचाली करीत नसल्याने अर्धी महामुंबई तहानलेली असल्याची बाब दिसून येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Oct 2015 रोजी प्रकाशित
हेटवणे धरणाचे पाच पंप कुचकामी; खारघरवासीयांना फटका
नवी मुंबईपासून ४८ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेण तालुक्यात सिडकोने वीस वर्षांपूर्वी हेटवणे धरण बांधले आहे.
Written by मंदार गुरव
Updated:
First published on: 31-10-2015 at 00:25 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hetawane dam five pump useless