नेरुळ येथील सेक्टर १७ मध्ये आज दुपारी भीषण दुर्घटना घडली. जिमी पार्क इमारतीच्या ए विंगमधील ६ व्या मजल्यापासून सर्व घरांच्या हॉलचा स्लॅब पहिल्या माळ्यापर्यंत पत्त्याप्रमाणे कोसळला. यात एक २९ वर्षीय तरूण ठार तर सात रहिवाशी गंभीर जखमी झाले. आचानक घडलेल्या या प्रकारामुळे इमारतीमधील रहिवाशी आणि परिसरातील नागरिक यांची एकच पळापळ उडाली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ढिगाऱ्या बाहेर काढले आणि नजीकच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. ज्या ६ मजल्यापासून ह़ॉलचा भाग तळमजल्यापर्यंत कोसळून ही दुर्घटना घडली.त्यामध्ये ६ मजल्यावरील घरामध्ये लादी बसवण्याचे काम सुरु होते.
नेरुळ येथील सेक्टर १७ मधील जिमी पार्क ही इमारत प्लॉट नंबर १८२ डी येथे ही ९ माळ्यांची इमारत आहे. या इमारतीला १९९४ साली महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र दिलेले आहे. आज दुपारी १२.३० च्या सुमारास इमारतीच्या ए विंगमधील सहाव्या माळ्यावरील घराच्या हॉलचा संपूर्ण स्लॅब पाचव्या माळ्यावरील घरात कोसळला. त्यामुळे पाचव्या माळ्यावरील हॉलचा स्लॅबही खाली कोसळत अशा पध्दतीने पहिल्या माळ्यापर्यंत सर्वच घरातील हॉलचे स्लॅब कोसळले. या दुर्घटनेत व्यंकटेश नाडर (२९) हा तरूण जागीच ठार झाला असून सुब्रमण्यम त्यागराजन (८४), निशा धर्मानी (५०), रिया धर्मानी (२०), सोनाली गोडबोले (२९), आदित्यराज गोडबोले (१५), सौमित्र गोडबोले (५०) आणि ललिता त्यागराजन (८०) हे सात जण जखमी झाले. त्यांना तातडीने नजीकच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना घडताच पालिकेच्या अग्निशमन पथकांनी व बचावपथकांनी अडकलेल्या रहिवाशांना इमारतीबाहेर काढले. सहाव्या मजल्यापासून ते तळमजल्यापर्यंत हॉलचा स्लॅब पडल्यामुळे अनेक रहिवाशी घरांमध्ये अडकून पडले होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडी लावून बाहेर काढले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त अभिजित बांगर, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड विभाग अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव पथकाला मार्गदर्शन केले. जिमी पार्क इमारतीत ३२ फ्लॅट व १० रो हाऊस आहेत. या इमारतीमधील सर्व रहिवाशांना इमारतीमधून हलवण्यात आले असून पालिकेच्यावतीने शहरातील भवन तसेच नेरुळ येथील अहिल्याबाई होळकर समाजमंदिर करण्यात येत असल्याची माहिती नेरुळ विभाग अधिकारी विनोद नगराळे यांनी दिली. तर इमारतीमध्ये ६ मजल्यावरील घरात फ्लोरींगचे काम सुरु असल्याची माहिती या सोसायटीचे अध्यक्ष शिरीष चित्रे यांनी दिली. तर तेजस्वी भोईर यांनी आम्ही याच इमारतीत तळमजल्यावर राहत असून दुर्घटना घडली तेव्हा हॉलमध्ये कोणीच नव्हते म्हणून कुटुंबिय बचावले असे सांगीतले.
नवी मुंबई शहरात अतिधोकादायक सी १ प्रकारच्या ६१ तर एकूण धोकादायक ५१४ इमारती आहेत.
जिमी पार्क सोसायटीचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले नाही…
जिमी पार्क इमारत अतिधोकादायक यादीमध्ये नाही परंतू या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घेण्याबाबत या सोसायटीला महापालिकेने नोटीस दिली होती. मात्र स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, हे जाणून घेण्यासाठी तज्ञांचे पथक घटनास्थळी पाठवले आहे. तसेच व्हीजेटीआयकडूनही या इमारती स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्यात येणार आहे. इमारत खाली करुन येथील नागरीकांची व्यवस्था शहरातील भवन व नेरुळ येथील समाज मंदीर येथे करण्यात आली आहे.-अभिजीत बांगर ,आयुक्त ,नवी मुंबई महापालिका