उरण तालुक्यात मागील सहा महिन्यांत तरुण अतिवेगवान दुचाकी चालवित असल्याने नागरिकांचा जिवाला धोका निर्माण झाला आहे. शहरात कानठळ्या बसवणारे आवाज करीत बेदरकारपणे दुचाकी चालवल्या जात आहेत. त्यामुळे अशा बेलगाम स्वारांना आवरण्यासाठी उरण पोलिसांनी शहरात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.
दुचाकीस्वारांच्या या कृतीचा बाजारातील ज्येष्ठ नागरीक, महिला तसेच पादचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचा तो कर्कश आवाज आणि वाहनांच्या वेगामुळे अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. अशा अनेक घटना उरणच्या बाजार पेठेत घडल्या आहेत. अपघातानंतर अनेक तरुण उलट दमदाटी करीत असल्याच्याही घटना घडल्या आहेत. शहरातून सध्या आठवी पासूनच्या विद्यार्थ्यांकडे अल्पवयातच दुचाकी वाहन दिले जाते. विद्यार्थी म्हणून वाहतुक पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.
मात्र सध्या याच वाहनांवरून डबल सीट ऐवजी तीन ते चार जण एकाच वेळी वेगाने आवाज करीत आरडा ओरडा करीतही जात असल्याचे चित्र अनेकदा पहावयास मिळत असल्याचे मत उरण मधील व्यवसायीक मनोज ठाकूर यांनी व्यक्त केल आहे. त्यातच सध्या जास्त पिकअप व वेगवान दुचाकींची फॅशन आली आहे.
त्यातूनच नंतर स्टंट सुरू होतात. याचा परिणाम अपघातात होऊ लागले आहेत. उरण मधील काही विद्यालयांनी विद्यार्थ्यांना दुचाकीची बंदी घातलेली असली तरी विद्यालयापासून दूर दुचाकी लावून दुचाकीचा वापर करीत आहेत. या संदर्भात उरणचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता अशा दुचाकीस्वारांना आळा घालण्यासाठी चाप लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.