सिडकोने वसविलेल्या खारघरमध्ये देशी-विदेशी मद्याच्या विक्रीला बंदी असतानाही खारघर सेक्टर १३ येथील गजानन पाटील यांच्या घरात शनिवारी रात्री साडेआठ वाजता किराणा मालाच्या दुकानातून दारूविक्री सुरू असताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. सहायक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. यातून पावणेदोन लाख रुपयांची दारू हस्तगत करण्यात आली. स्थानिक पोलिसांशी संगनमत करून ही दारू विकली जात असल्याची कबुली पाटील यांनी पोलिसांना दिली.
खारघर वसाहतीतील दारूबंदी कायम रहावी, यासाठी येथील खारघर संघर्ष समिती अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. याच प्रयत्नांमुळे वसाहतीमधील शांतता अबाधित राहण्यास मदत झाली. मात्र गजानन पाटील यांच्यावर अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने त्यांचा हा धंदा तेजीत सुरू होता. किराणा मालाच्या दुकानासोबत त्यांनी शेजारच्या घरात मोठा दारूसाठा केला होता. सहायक आयुक्तांसह सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद यादव, सुवर्णा राऊत व अबू जाधव यांच्या पथकाने या साठय़ावर छापा मारला. त्यानंतर खारघरच्या पोलिसांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. हा दारूसाठा किशोरशेठ व राजूशेठ हे दोन व्यापारी पुरवत असल्याचे पाटील यांनी पोलिसांना सांगितले. हे दोनही व्यापारी कळंबोली व पनवेलचे असल्याचे समजते.