नवी मुंबई : नवी मुंबईतील जुई नगर येथे एका रुग्णवाहिकेचा वापर चक्क बांधकाम साहित्य वाहून नेण्यास केला जात असल्याचे निदर्शनास आले. याबाबत संबंधित रुग्णालय व्यवस्थापकाला विचारणा केली असता चुकून घाईत झाल्याचे सांगत सारवासारव केली आणि दिलगिरी व्यक्त केली गेली.
जुई नगर येथे मंगल प्रभू रुग्णालय असून या रुग्णालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्याच रुग्णवाहिकेत बांधकाम साहित्याचे वहन करत असल्याचे समोर आले. याबाबत रुग्णवाहिका वाहनचालक यांच्याकडे विचारणा केली असता रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे आम्ही करत आहोत, असे उत्तर मिळाले. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली असता याबाबत डॉ. आनंद सुडे यांनी धक्कादायक माहिती दिली.
रुग्णालयात असलेल्या विद्युत प्रणालीत अर्थिंग समस्या उद्भवली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक अभियंत्याने अर्थिंग समस्याचा निपटारा होईपर्यंत कुठलीही इलेक्ट्रिक साधने वापरू नये असे सांगितले. त्यामुळे तातडीने अर्थिंग बसवण्यात आले. हे काम तातडीचे असल्याने अर्थिंगसाठी खोदण्यात आलेला खड्डा बुझवण्यास या बांधकाम साहित्याची गरज होती. वाहन चालकाला गाडीत सामान आण असे सांगण्यात आले, मात्र त्याने अन्य वाहनांऐवजी रुग्णवाहिकेचा वापर केला, अशी माहिती दिली, तसेच घडलेल्या प्रकराबाबत डॉ. सुडे यांनी दिलगिरीही व्यक्त केली.