नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) कांदा-बटाटा मार्केटमध्ये फेकून दिले जाणारे खराब, कुजलेले आणि सडलेले कांदे पुन्हा किरकोळ बाजारात विक्रीस काढल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. बाजारात सडून गेलेल्या कांद्यांची पोती दररोज मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येतात. मात्र त्यातील काही पोती गुपचूपपणे गोळा करून स्थानिक फेरीवाले व किरकोळ विक्रेते त्याचा ‘उपयुक्त’ भाग वेगळा करून पुन्हा विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एपीएमसीमध्ये दररोज हजारो क्विंटल कांद्याची उलाढाल होते. त्यात खराब होणाऱ्या मालाचे प्रमाण १० ते १५ टक्क्यांपर्यंत पोहोचते. ही पोती बाजार आवारात, गेटजवळ किंवा मागच्या बाजूस कचराकुंड्यांमध्ये टाकली जातात. याच मालाची विल्हेवाट लावण्याऐवजी काही जण त्याचा फेरवापर करत आहेत. विशेषतः घनदाट वस्ती असलेल्या परिसरांमध्ये, झोपडपट्टी भागात व भाजीच्या हातगाड्यांवर असे कांदे खुले विकले जात आहेत. अन्न सुरक्षा कायद्यानुसार खराब अन्नपदार्थांची विक्री गुन्हा मानला जातो. दोषी आढळल्यास दंड आणि कारावासाची तरतूद आहे. मात्र यासंबंधी अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याने याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
…तर जंतुसंसर्गाचा धोका
काही फेरीवाल्यांकडून स्वस्त दरात चांगला कांदा मिळतो या भ्रमात नागरिकही तो कांदा घेतात. परंतु सडलेले किंवा बुरशी लागलेले कांदे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. अन्नातून विषबाधा, अन्नातून होणारे जंतुसंसर्ग किंवा पचनाचे विकार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
या प्रकारांकडे एपीएमसी प्रशासन, आरोग्य विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन (FSSAI) यांचे दुर्लक्ष होत असल्याची व्यापाऱ्यांत चर्चा आहे. “हे प्रकार नियमितपणे सुरू आहेत. खराब कांद्याच्या पोत्यांवर कोणतीही विशेष खूण नसते. त्यामुळे हा माल पुन्हा विक्रीस येतो. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याशी मोठा खेळ होत आहे, असे मत कांदा-बटाटा घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केले.