नवी मुंबई : रस्त्यावर फिरणारे कचरा वेचक भंगार वेचक तसेच विविध वस्तू फिरून विकण्याचा बहाणा करून चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवणे धोकादायक झाले आहे. नवी मुंबईत असाच उघड्या दरवाजातून भंगार वेचक दोन महिलांनी प्रवेश केला. आणि ४० हजार रुपयांची दोन कर्णफुले चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील एका महिलेने प्रतिकार केला असता तिच्या हाताला चावा घेऊन जखमी केले आहे. या प्रकरणी दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका महिलेस अटक केली असून दुसरीचा शोध सुरु आहे.
नवी मुंबईतील तळवली गावात अब्बू आमार शाह या राहतात. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास त्या घरात आपल्या कामात व्यस्त असताना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्या द्वारे दोन महिलांनी घरात हळूच प्रवेश केला. त्यावेळी टेबल वर ठेवण्यात आलेले पाच ग्रॅम वजनाचे चाळीस हजार रुपयांचे दोन कर्णफुले त्या दोन महिलांनी चोरी केले. मात्र बैठकीत कोणीतरी आले असल्याची चाहूल शाह यांना होताच त्या बैठक खोलीत आल्या दोन अनोळखी महिला घरात घुसल्या असून त्यांनी कर्णफुले घेतली आहेत हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कर्णफुले घेऊन जाऊ नये म्हणून प्रतिकार करणे सुरु केले.
त्यात एका महिलेला शाह यांनी पकडून ठेवले त्यामुळे आता आपण पकडले जाऊ या भीतीने तिने शाह यांच्या उजव्या हाताला चावा घेतल्याने शाह यांची पकड ढिली झाली आणि दोघी पळून जाऊ लागल्या मात्र आरडा ओरडा ऐकून परिसरातील लोक हि जमा झाले होते. त्यांनी हि महिलांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातील अर्चना कार्तिक पवार ही महिला पळून जाण्यात यशस्वी ठरली तर अकिला सोनू पवार हिला पकडण्यात यश आले. तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले . अकिला सोनू पवार हिची अंगझडती घेतली असता तिच्या कडे चोरी केलेले कर्णफुले आढळून आली. मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संशयित आरोपी अकिला पवार आणि पहिजे असलेली संशयित आरोपी अर्चना पवार या दोघी भंगार वेचक म्हणून सर्वत्र फिरून भंगार गोळा करून ते विकून उदरनिर्वाह करतात. अशी प्राथमीक माहिती समोर आली आहे. मात्र संधी मिळाली कि चोरी करतात असा एक प्रकार समोर आला असला तरी अजून काही गुन्हे केले आहेत काय ?याचा तपास सुरु आहे. अटक महिला मूळ सोलापूर जिल्ह्यातील जवळा गावातील असून सध्या फुल मार्केट दादर येथे वास्तव्य करीत आहेत. तसेच त्यांच्या समवेत एक २ वर्षाचा मुलगा होता. तो लहान असल्याने त्यांच्या पालन पोषण साठी समवेत ठेवण्यात आले आहे.