उरण : केंद्रीय जलवाहतूक मंत्र्यांच्या हस्ते उदघाटन बहुचर्चित जेएनपीए-मुंबई ई बोट सेवा सहा महिन्यांपासून रखडली आहे. तर या सागरी मार्गावरील अत्याधुनिक ई-स्पीड बोट सेवाला आता नव्याने १५ ऑगस्टचा मुहूर्त निघाला आहे. मात्र याही मुहूर्तावर ही सेवा सुरू होईल का ? अशी शंका आहे कारण जर १५ ऑगस्टला सेवा सुरू न झाल्यास ती १ सप्टेंबरचा मुहूर्तावर सुरू करणार असल्याचे माझागात डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीचे म्हणणे आहे.

जेएनपीए बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेसाठी ई लॉंच सुरू करण्यात येणार आहेत. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ही सेवा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. या लॉंच मुळे तास भराचा हा प्रवास अवघ्या २५ मिनिटांत वातानुकूलित ई स्पीड बोट मधून करता येणार आहे. त्यामुळे उरणकरांना गारेगार प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे. या जलद प्रवासासाठी जादाचे दर आकारले जाणार आहेत.

जेएनपीए बंदर ते गेट वे ऑफ या मार्गावरील लाकडी प्रवासी बोटींना अलविदा करण्याचा निर्णय जेएनपीए संचालक मंडळाने घेतला आहे. या लॉंचचे उदघाटन केंद्रीय बंदर विभाग मंत्र्यांनी केले आहे. त्यानंतर ही सेवा सुरू झालेली नाही. या प्रदुषण विरहीत रहित स्पीडबोटीमुळे २५ मिनिटांत प्रवाशांना जेएनपीए-मुंबई दरम्यान पोहचता येणार आहे.याचा फायदा या सागरी मार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्वांनाच होणार आहे. या सागरी मार्गाने जेएनपीएचे कामगार, नातेवाईक, स्थानिक प्रकल्पग्रस्त,कस्टम, एअरफोर्स,सीआयएसएफ,पोर्ट युजर्स आदी कामगारांसाठी वापर करता येत आहे. सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत या मार्गावरुन बोटी सुरू असतात.

प्रदुषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या स्पीडबोटींचा पर्याय स्वीकारला आहे.प्रदुषण विरहीत, सुरक्षित आणि कमी वेळेत मुंबईत ये जा करण्यासाठी स्पीडबोटींचा पर्याय स्वीकारण्याची संकल्पना वर्षाभरापुर्वीच जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी अंमलात आणण्यासाठी सुचना केली होती. मात्र तांत्रिक कारणाने ही सेवा लांबली आहे. येत्या आठवड्याभरात ही सेवा प्रात्यक्षिक घेऊन सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. उरण रेल्वे मार्गावर पावणेदोन वर्षांपासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाल्याने जेएनपीए-मुंबई सागरी मार्गावर प्रवासी संख्या रोडावली आहे. यामुळे जेएनपीएला जेएनपीए-मुंबई या सागरी प्रवासी मार्गावरील बोट सेवेचा खर्च परवडत नाही. त्यातच या प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या जुनाट लाकडी बोटी खर्चिक व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही उपयुक्त नसल्याने स्पष्ट झाले आहे.

३८ कोटींच्या खर्चाची तरतूद

अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त दोन फायबरच्या हलक्या ई-स्पीडबोटी १० वर्षांच्या कालावधीसाठी पुरवठा करण्याचे काम माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीला दिले आहे. यासाठी जेएनपीएने ३७ कोटी ८२ लाख ९४ हजार १९० रुपये खर्चाची तरतूदही केली आहे.उन्हाळी हंगामात २० ते २५ प्रवासी व दोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविलेल्या दोन स्पीडबोटी फेब्रुवारी पासूनच प्रवासी वाहतुकीसाठी दाखल होणार होत्या. पावसाळी हंगामात १० ते १२ क्षमतेच्या मात्र, स्पीडबोर्टीचा वेग, प्रवासी वाहतुकीची क्षमता, तांत्रिक अडचणीमुळे सहा महिन्यांपासून ही सेवा सुरू करण्यात विलंब होत आहे. पुन्हा चाचणी करणार चार्जिंग प्रणाली अद्ययावत करण्याचे काम एका कंपनीकडे सोपविले होते. हे काम आवश्यकतेनुसार करून दिले. ई-स्पीड बोटीच्या पुन्हा चाचण्या घेण्यात येणार आहेत.