नागरी सुविधांची परिपूर्ती, लोककल्याणकारी सुविधांबरोबर कर वसुलीची उत्तम कामगिरी करीत आर्थिक सक्षमतेत नवी मुंबई पालिका आघाडीवर राहिली आहे. ‘इंडिया रेटिंग अ‍ॅण्ड रिसर्च’ या देशातील मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने पालिकेला ‘डबल ए प्लस स्टेबल’ हे पतमानांकन जाहीर झाले असून सलग पाचवेळा हे मानांकन मिळविणारी नवी मुंबई महापालिका हे देशातील एकमेव आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन २०१८-१९ वर्षांच्या अर्थसंकल्पात  २०६४ कोटी ३ लक्ष जमा तसेच १७६२ कोटी २८ लक्ष इतका खर्च करीत पालिकेने नागरिकांना अभिप्रेत सुविधांची पूर्तता केली आहे. लोककल्याणकारी सुविधा पुरविण्याकडे लक्ष देत मागील आर्थिक वर्षांत अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत कर वसुलीची उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती सक्षम आहे. त्याचप्रमाणे विविध करांद्वारे प्राप्त निधीमधूनच नागरी सुविधांची परिपूर्ती केली आहे.

यावर्षी रुग्णालय सुविधांची पूर्तता, ‘डिजिटल क्लासरूम’ संकल्पनेसह शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता विकास, अडथळाविरहित पदपथ-रस्ते, विविध समारंभांसाठी सभागृहे, सायकल ट्रॅक, स्मृतीवन संकल्प या कामांना प्राधान्य दिले. स्वच्छ भारत अभियानात राज्यात प्रथम व देशात सातव्या स्थानावर झेप घेतली.  देशात सर्वोत्तम शहराचा बहुमान या शहरास लाभला असून निवासयोग्य शहरांमध्ये देशातील दुसरे शहर नवी मुंबई आहे.

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड यांनी आर्थिक नियोजनाकडे बारकाईने लक्ष दिले आहे. लेखा विभागामार्फत ‘होस्ट टू होस्ट’ या अभिनव प्रणालीद्वारे पारदर्शकता आली असून पेपरलेस व गतिमान कारभार होत आहे. कोणाचेही थकीत कर्ज, व्याज अथवा करबाकी नाही. त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती सक्षम आहे.

महापौर जयवंत सुतार आणि सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांनी आर्थिक क्षमतेचे हे मानांकन प्राप्त झाल्याबाबत प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

पालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या नियोजनबद्ध कामामुळे व सर्व नागरिकांच्या व सहकार्याच्या अथक मेहनतीमुळे पालिकेला हा गौरव मिळाला आहे.

– धनराज गरड, उपायुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी