नवी मुंबई : कोपरखैरणेत बेशिस्त वाहनचालकांवर वचक बसवण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याऐवजी कुठे तरी एखाद्या ठिकाणी दबा धरून वाहतूक पोलीस उभे राहत आहेत. त्यामुळे दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र बेशिस्त वाहनचालकांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सामान्य नागरिकांची सुटका होत नसल्याने पादचाऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात संताप आहे.

नवी मुंबईत कोपरखैरणे सर्वाधिक लोकसंख्या आहे. दाट लोकवस्ती त्यात प्रचंड फेरीवाले झाले आहेत. यामुळे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून वाहन चालवले जाते. याचा सर्वाधिक त्रास गर्दीच्या वेळी होतो. रा. फ. नाईक चौक, तीन टाकी चौक आणि स्टेशनसमोरील रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी, तर येथील सेवा रस्त्यावरून चारचाकी वाहनेही मुख्य रस्त्यावरून बोनकोडेच्या दिशेने विरुद्ध मार्गांवरून चालवल्या जातात. या शिवाय चौकात असणाऱ्या डी मार्टमधून मालपुरवठा करून बाहेर पडणारे माल वाहतूक वाहने क्राॅसिंगच्या ठिकाणी समोर आल्याने वाहतूक कोंडी होते. शिवाय सेक्टर पाच रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर कुठलीही शिस्त आढळून येत नाही. या ठिकाणी सर्वाधिक त्रास हा बेशिस्त रिक्षाचालकांचा होतो. या ठिकाणीही वाहतूक पोलीस दिसणे दुर्मीळ झाले आहे.

दंडात्मक कारवाई आवश्यक

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस दिसत नाहीत, मात्र अन्यत्र अनेक ठिकाणी वाहन वळवले की अचानक दबा धरून बसलेले पोलीस पथक समोर येते. अशा ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा वाहतूक कोंडीस कारण असणाऱ्या घटकांना चाप बसेल अशी कारवाई अपेक्षित आहे. अशी प्रतिक्रिया येथील रहिवासी राजीव भट यांनी दिली. कोपरखैरणे वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची बदली झाली असून सध्या पदभार एपीएमसी पोलिसांना देण्यात आला आहे. त्यामुळे जरा विस्कळीतपणा आल्याची माहिती एका वाहतूक पोलिसाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.