जेएनपीटी बंदरातील जहाजातील दोन कंटेनर शुक्रवारी समुद्रात कोसळण्याची घटना घडली असून पुन्हा एकदा जेएनपीटीमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बंदरातील कामकाज करीत असताना जेएनपीटीमध्ये अनेक अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. जहाजातील दोन कंटेनर समुद्रात पडून ते वाहत दुसऱ्या बंदरापर्यंत पोहचले होते. दरम्यान कोणत्याही जहाजाची ये-जा नसल्याने अपघात टळला असला तरी या घटनेमुळे बंदरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बंदरातील क्रेनवर काम करीत असताना पंधरा ते वीस फुटावरून पडून अपघात झाला होता.या अपघातात भरत म्हात्रे या कामगाराचा फेब्रुवारीमध्ये मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना हा अपघात घडला आहे. शुक्रवारी जेएनपीटी बंदरात उभ्या असलेल्या एका जहाजातून कंटेनर हाताळणी करीत असताना दोन रिकामे कंटेनर समुद्रात कोसळले. जेएनपीटीमधील हे कंटेनर लिक्वीड व प्रवासी जेटीपर्यंत वाहत आले होते.
याची माहिती मिळाल्यानंतर जेएनपीटी बंदरातील कर्मचाऱ्यांनी दोन्ही कंटेनर थांबविण्याचा प्रयत्न केला. या कंटेनरचा धक्का लागून समुद्रातून ये-जा करणाऱ्या प्रवासी जहाजालाही अपघात होण्याची शक्यता होती.२००८ साली चित्रा व खलिजा या दोन जहाजाच्या टकरी नंतर अनेक कंटेनर अलिबाग,उरण,मुंबई तसेच कोकणातील किनाऱ्यावर लागले होते.या संदर्भात जेएनपीटीच्या मरिन विभागाचे प्रमुख कॅप्टन बी.एस.कुमार यांच्याशी संपर्क साधला असता कंटेनरची हाताळणी करीत असताना व्यवस्थित लॉक न लागल्याने किवा लॉक जॅम झाल्याने दोन कंटेनर समुद्रात पडल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.