नवी मुंबई : पालकांनी पोटाला पीळ देत शिक्षण पूर्ण केले. नोकरीं मिळवून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी धडपड नोकरीं न मिळाल्याने व्यर्थ ठरली. या मुळे आलेल्या नैराश्यातून एका २६ वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर पाच येथे घडली आहे. कोपरखैरणे येथे राजू मोरे हे राहत असून ते माथाडी कामगार आहेत. आर्थिक चणचण असतानाही त्यांनी मुलगी अश्विनी हिचे शिक्षण पदवी पर्यंत पूर्ण केले.

अश्विनी हिला आपल्याला कुठल्या परिस्थितीतून पालकांनी शिक्षण दिले याची जाणीव होती. त्यामुळे नोकरीं करून कुटुंबाला हातभार लावावा म्हणून ती नोकरीच्या शोधात होती. मात्र पदवी मिळुनही त्या योग्यतेची नोकरीं मिळत नसल्याने गेले काही महिने ती नैराश्यात होती.

या नैराश्यातून तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने रविवारी संध्याकाळी घरात सर्वजण असताना स्वतः एका खोलीत गेली. बराच वेळ झाला ती बाहेर आली नाही. ती कदाचित झोपली असेल असे वाटले. मात्र सहा वाजले तरी ती बाहेर न आल्याने तिला उठवण्यासाठी म्हणून आत जाऊन पहिले असता ती गळफास घेतल्याच्या अवस्थेत होती.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच एक पथक घटनास्थळी रवाना झाले. त्या युवतीला वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल केले. मात्र रात्री आठच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत अधिक माहिती देताना कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले की मयत युवती ही अविवाहित असून तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नुसार गेले सहा महिने ती नैराश्यात होती. पदवीधर होऊनही त्या नोकरीं मिळत नसल्याने तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे असे प्रार्थमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. डी. वरुडे हे करीत आहेत.