नळजोडणीला मीटर बसविण्याच्या कामाला वेग
कळंबोली नोडमधील सिडकोने बांधलेल्या इमारतींमधील जलवाहिनींना सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने मीटर बसविण्याचे काम सुरू केल्याने येथील रहिवाशांना आता दुप्पट पाणीपट्टी भरावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात सिडको कळंबोली येथे ५१० मीटर बसविणार असून यासाठी सिडकोने के. एल. ५ येथील इमारतींमधील रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत. सिडकोने बांधलेल्या प्रत्येक सदनिका व बैठय़ा चाळीतील घरांमधील जलवाहिनींना यामुळे लवकरच मीटर बसणार आहेत. विशेष म्हणजे सिडकोच्या या निर्णयामुळे अत्यल्प गटातील घरांमधील रहिवाशांना भरावे लागणाऱ्या पाणीपट्टी प्रश्नासाठी अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने हा प्रश्न हाती घेतलेला नाही.
अपुऱ्या पाणीपुरवठय़ाचे संकट तोंडावर असताना पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी सिडकोने वसविलेल्या वसाहतीमधील पाणी ग्राहकाला दोन महिन्याला एकदा पाणी बिल पाठवून येथील पाणी पट्टी वसूल करत होते.
महिन्याला ६० ते ८० रुपये या दराने पाणी बिल आकारणी केली जात होती. परंतु बैठय़ा चाळींमधील वाढीव बांधकामांमुळे मूळ एका घराचे सहा विविध घरे बांधण्याचा विक्रम रहिवाशांनी केल्याने सिडकोने पाण्याच्या वापरानुसार बिलाची आकारणी करावी असे धोरण अवलंबत बैठय़ा वसाहतींमध्ये जलमीटर लावून पाणी पट्टी वसूल करण्याचा निर्णय घेतला. नवीन पनवेल वसाहतीमधील बैठय़ा वसाहती आणि काही परिसरात जलवाहिनीला मीटर बसविण्यात आले आहे. परंतु येथील काही रहिवाशांच्या विरोधामुळे सिडको प्रशासनाला येथे काही प्रमाणात अपयश आले.
अखेर सिडकोने कळंबोलीमध्ये जलमीटर लावण्याचे काम हाती घेतले आहे. कळंबोली वसाहतीमधील खासगी गृहनिर्माण सोसायटय़ांमधील रहिवासी मीटरप्रमाणे पाणी पट्टी भरतात. त्यामुळे या रहिवाशांनी समान नियमानुसार पाण्यावरील बिलाची आकारणी असावी अशी मागणी केल्याने काही प्रमाणात सिडकोच्या जलमीटर लावण्याच्या कारवाईला बळ मिळत आहे.