खर्चवाढीने करंजा बंदराची रखडपट्टी

ससून डॉक मच्छीमार बंदरावरील ताण कमी व्हावा, या उद्देशाने उरणच्या करंजा येथे नवे बंदर उभारले जात आहे.

खडक लागल्याने बंदराचे काम अर्धवट अवस्थेत आहे.

ससून डॉक मच्छीमार बंदरावरील ताण कमी व्हावा, या उद्देशाने उरणच्या करंजा येथे नवे बंदर उभारले जात आहे. दहा हजारांहून अधिक जणांना रोजगार देणाऱ्या या बंदरासाठी लागणारे १५० कोटी रुपयांना मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे चार वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. यावर प्रस्ताव तयार आहे. सहा महिन्यांत बंदराचे काम सुरू होईल अशी माहिती बंदर विभाग अधिकाऱ्यांनी दिली.
मासेमारीनंतर मासळी विक्रीची सोय असलेले मुंबईत ससून डॉक हे एकमेव बंदर आहे. या बंदरात मासळीची खरेदी विक्री, सफाई, साठवणूक, प्रक्रिया होत असते. गुजरातमधीलही मासळीचाही यात समावेश असतो. ससून बंदरात मासेमारी बोटींची संख्या वाढल्याने जागा कमी पडू लागली आहे. या बंदरात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे १५ ते २० हजार रोजगार उपलब्ध आहेत. २०११ मध्ये करंजा येथे केंद्र आणि राज्य सरकारने ७५ आणि २५ टक्केच्या हिस्सेदारीतून ७० कोटी रुपये खर्चाचे नवे मच्छीमारी बंदर उभारण्यास सुरुवात केलेली होती. त्यामुळे कोकणातील मच्छीमारांना मासेविक्रीसाठी जवळचे बंदर मिळणार आहे. त्यामुळे याची प्रतीक्षा येथील मच्छीमारांना आहे.
करंजा बंदरातील ब्रेक वॉटरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील काम करीत असताना २०१२ साली खडक लागल्याने बंदराच्या कामाच्या खर्चात वाढ होऊन तो ७० कोटीवरून दीडशे कोटींवर पोहोचला आहे. तर मच्छीमार बंदराच्या नियमात बदल होऊन केंद्र व राज्य सरकारच्या हिश्श्यात ५०-५० टक्केची सुधारणा करण्यात आली. या नवीन खर्चाच्या कामाची निविदा बंदर विभागाकडून काढल्याची माहिती बंदर विभागाचे कार्यकारी अभियंता राम काटकर यांनी दिली. बंदराच्या वाढीव खर्चाची निविदा जाहीर करण्यात आली आहे. त्याला सहा महिन्यात मान्यता मिळेल, असे ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Karanja port project work stuck due to cost increased