शेतकऱ्यांच्या सहकार्यातून गुजरातच्या धर्तीवर मुंबई, नवी मुंबईला पर्याय म्हणून नयना क्षेत्रात आणखी छोटी मोठी २३ शहरे वसविण्याच्या सिडकोच्या संकल्पाला खालापूरच्या शेतकऱ्यांनी अनुकूलता दर्शवली आहे. खालापूरमधील ११ शेतकऱ्यांनी सिडकोला ५० टक्के जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे. नयनामध्ये गुजरात पॅटर्न राबविण्यासाठी हे शेतकरीे चार हजार हेक्टर जमीन देण्यास तयार आहेत. या शेतकऱ्यांच्या सिडकोवाऱ्या वाढल्या असून प्रशासन त्यांच्याशी चर्चा करीत आहे. मात्र नवी मुंबईला खेटून असलेले पनवेल, उरण येथील शेतकरी नयनाबाबत अद्याप तळ्यात- मळ्यात आहेत. राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील सहा तालुक्यांअंर्तगत ६० हजार हेक्टर जमिनीचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली आहे. त्यानुसार सिडको कामाला लागली असून पनवेल तालुक्यातील २३ गावांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. शासनाने विकास आराखडा तयार करण्यास दिलेल्या २७० गावांतील शेतकऱ्यांच्या ५० टक्के जमिनी सहकारी तत्त्वावर घेऊन छोटी-मोठी शहरे वसविण्याचे सिडकोचे लक्ष्य आहे. त्यासाठी सिडकोने शेतकऱ्यांना आम्हाला पन्नास टक्के जमीन द्या, त्या बदल्यात दोन वाढीव चटई निर्देशांक (एफएसआय) घ्या, असा प्रस्ताव दिला आहे. सिडकोला मिळणाऱ्या ५० टक्के जमिनीत सिडको पायाभूत सुविधा उभारणार आहे. त्यातील दहा टक्के जमीन विकून सिडको पायाभूत सुविधांवर झालेला खर्च वसूल करणार आहे. सिडकोने यापूर्वी ही अट दहा हेक्टर जमिनीची ठेवली होती. त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने ती अट शिथिल करून आता साडेसात हेक्टर जमिनीची अट ठेवण्यात आली आहे. त्यासाठी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना नैना प्रकल्प काय आहे ते समजावून सांगत आहेत. आतापर्यंत दोन गावांत अशी प्रबोधन शिबिरे झाली आहेत. सिडकोचे हे प्रबोधन कार्य सुरू असताना खालापूर तालुक्यातील ११ शेतकऱ्यांनी सिडको प्रशासनाशी संपर्क साधला असून त्यांनी त्यांची चार हजार हेक्टर जमीन देण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या जमिनीतच वाढीव एफएसआयच्या जोरावर एखादे छोटे शहर निर्माण होऊ शकणार आहे. या शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात पायाभूत सुविधा दिल्या जाणार असून वाढीव चटई निर्देशांकामुळे त्यांनी दिलेल्या जमिनीच्या रूपात जादा क्षेत्रफळाची घरे बांधता येणार आहेत. ही चर्चा प्राथमिक पातळीवर आहे. नवी मुंबईजवळच्या पनवेल, उरण तालुक्यातील शेतकरी योजनेचा कानोसा घेत असताना खालापूरच्या शेतकऱ्यांनी चार हेक्टर जमीन नयना प्रकल्पाला देऊ करून बाजी मारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिडकोसाठी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाएवढाच नैना प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहे. त्या दृष्टीने २३ गावांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. शासनाकडे उच्च अधिकाऱ्यांची मागणीदेखील करण्यात आली आहे. मुंबईपेक्षा हे क्षेत्रफळ दुप्पट असून येथे एक सुनियोजित शहर तयार व्हावे, अशी सिडकोची अपेक्षा आहे. गुजरातमध्ये शेतकऱ्यांच्या सहकार्यातून अशा नगरी तयार झालेल्या आहेत. शासनाच्या मान्यतेनुसार या शेतकऱ्यांना वाढीव एफएसआय दिला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे हित समजावून सांगितले जात असून त्याला खालापूरच्या ११ शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे.
व्ही. राधा, सहव्यवस्थापकीय संचालिका, सिडको.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khalapur farmers taking initiative for cidco naina project
First published on: 24-09-2015 at 02:47 IST