नवी मुंबई : वाशीतील अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत तीन किमी लांबीचा उड्डाणपूल उभारण्यासाठी ३९० वृक्ष हटवण्याच्या प्रयत्नांना सर्व स्तरांतून विरोध होत असताना वाहतुकीच्या दृष्टीनेही हा पूल व्यवहार्य नसल्याचे वाहतूक विभागातील पोलीस अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे. या रस्त्यावर सतरा प्लाझापासून एपीएमसीकडे जाणाऱ्या पुढच्या चौकापर्यंतच्या जेमतेम ५०० मीटर अंतरावर वाहतूक कोंडीची समस्या जाणवते आणि त्यामागील प्रमुख कारण बेकायदा पार्किंग असल्याचे वाहतूकतज्ज्ञही सांगतात. ही समस्या दूर केल्यास रहदारी कोणत्याही अडथळय़ाविना सुरळीत होईल, असेही सांगण्यात येत आहे.
अरेंजा कॉर्नर ते कोपरी पुलापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी या रस्त्याच्या दुभाजकावरील सहा झाडे मुळासकट पाडण्यात येणार असून ३८४ झाडांचे पुनरेपण करण्यात येणार आहे. या निर्णयाला पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत असतानाच वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी या पुलाच्या उपयुक्ततेबाबतच प्रश्न उपस्थित केले आहेत.
नवी मुंबईत ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते ती ठिकाणे वाहतूक विभागाने अधोरेखित करून त्यावर मागील सहा महिन्यांपासून काम सुरू केले आहे. त्यात अरेंजा कॉर्नर ते कोपरी दरम्यान केवळ सतरा प्लाझा हे एकमेव ठिकाण आहे. तीन किलोमीटरच्या पट्टय़ात केवळ पाचशे मीटरच्या पट्टय़ात वाहतूक कोंडी होते. वाहनतळ केल्यावर ही समस्याही सुटू शकते, असे वाहतूक पोलिसांनी मत व्यक्त केले. पाम बीच मार्गावरून ठाणे, ऐरोलीकडे जाणारी वाहने अरेंजा कॉर्नरपासून उजवीकडे वळून थेट ठाणे-बेलापूर मार्ग गाठतात. अशा वाहनचालकांना या पुलाचा काही उपयोग नाही, असे मत वाहतूक विभागातील काही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
‘पार्किंग व्यवस्थेने प्रश्न सुटेल!’
वाहतूक पोलिसांच्या मते, पूल उभारण्याऐवजी सतरा प्लाझा ते एपीएमसीपर्यंतच्या रस्त्यावरील बेकायदा पार्किंग दूर केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्यासाठी येथे बहुमजली पार्किंगची व्यवस्था निर्माण करता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
‘आप’ आक्रमक
या प्रस्ताविक उड्डाणपुलाच्या उभारणीला आम आदमी पक्षाने विरोध केला असून याबाबत पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. कोपरी गाव ते अरेंजा कॉर्नर दरम्यान दिवसाला शेकडो वाहने उभी असल्याचे दिसून येते. मात्र या वाहनांवर कधी कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे, असा सवाल ‘आप’ने केला आहे.
पाम बीच (अरेंजा कॉर्नर ते कोपरी आणि पुढे बोनकोडे), वाशी-कोपरखैरणे नियमित रस्ता आहे. असे
असताना या रस्त्यावर उड्डाणपुलाची गरज काय?
झाडांचे पुनरेपण करून ती जगवण्यासाठीची तांत्रिक सज्जता पालिकेकडे आहे का? – आबा रनावरे, निसर्गप्रेमी फाऊंडेशन, सानपाडा,
येणाऱ्या काळात वाहतूक वाढणार आहे. त्यावेळी या उड्डाणपुलामुळे कोपरी आणि अरेंजा कार्नर हे चिंचोळे (बॉटलनेक) मार्ग ठरून कोंडी अधिक वाढेल. त्याऐवजी शीव-पनवेल मार्ग ते बोनकोडे ते ठाणे-बेलापूर मार्गापर्यंत पूल बांधला तर भविष्यातील समस्या सुटेल. – विनय मोरे, वाहतूकतज्ज्ञ