नवी मुंबई : कोकण रेल्वेने आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने निर्णायक टप्पा गाठला असून, लवकरच संस्थेचं सुमारे १५०० कोटी रुपयांचे जुने कर्ज फेडून कर्जमुक्त होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली आहे. नवी मुंबईतील बेलापुर भवन येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कोकण रेल्वे ही देशातील एकमेव रेल्वे संस्था आहे जी सुरुवातीपासून नफ्यात राहिलीय, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

कोकण रेल्वेच्या आर्थिक स्थितीबद्दल सांगताना झा यांनी, “कोकण रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, प्रवासी सेवा, आणि संरक्षक यंत्रणा बळकट करण्यासाठी सुमारे ७२०० कोटी रुपयांचे प्रकल्प सध्या कार्यान्वित आहेत. यावर्षी आणखी १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या गुंतवणुकीतून स्थानकांचं आधुनिकीकरण, ट्रॅक क्षमता वाढवणं, आणि संरक्षित ड्रेनेज यंत्रणा इत्यादि कामे करण्यात येणार आहेत.” अशी माहिती दिली. तसेच गेल्या सव्वा महिन्यात सुमारे ३ हजार कोटींच्या निविदा कोकण रेल्वेला प्राप्त झाल्या असून कामे प्रगती पथावर असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना झा यांनी रत्नागिरी स्थानकाचा पुनर्विकास एमआयडीसीच्या सहकार्याने लवकरच करण्यात येणार असून, कोकण रेल्वे मार्गावरील १६ ठिकाणी पूर्वी रद्द केलेले थांबे पुन्हा सुरू करण्यात आल्याचेही सांगितले. हे प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

यासोबतच, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ६९ रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं उभारण्यात आलं असून, दरड कोसळण्याच्या घटना पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय प्रमाणात कमी झाल्या आहेत. दरवर्षी सुमारे २०० घटनांची नोंद होत होती, ती आता २–३ वर आली आहे, असं रेल्वे प्रशासनातर्फे झा यांनी स्पष्ट केले. तसेच, महाराष्ट्रातील ११ रेल्वे स्थानकांची स्वच्छता कोकण रेल्वेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही झा यांनी सांगितले.

कर्जमुक्त कोकण रेल्वेचं भविष्य उज्ज्वल

आर्थिक वर्ष २०२३-२४ अखेर कोकण रेल्वेवर अंदाजे ८,८३८ कोटी रुपयांचे कर्ज आहे. यात १,५०० कोटी रुपयांचे आर्थिक रोखे आणि उर्वरित ७,३३८ कोटी रुपये इतर संस्थांकडून घेतलेले कर्ज यांचा समावेश होता.

ज्यापैकी कंपनीने जानेवारी २०२५ पर्यंत ७८० कोटी रुपयांच्या नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचरची (NCD) यशस्वी परतफेड केली आहे. तर, आणखी २५० कोटी रुपयांच्या नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचरची ची परतफेड आर्थिक वर्ष २०२६ मध्ये देय आहे. याव्यतिरिक्त, कंपनी नियमितपणे कर्जाचे इतर हप्ते आणि व्याज भरत असून, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये सुमारे ८७.५ कोटी रुपयांच्या दीर्घकालीन कर्जाची परतफेड देय आहे. जी कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या उत्पन्नातून करणे अपेक्षित आहे. यामुळे कोकण रेल्वे भविष्यातील कर्जमुक्तीसाठी नियोजनबद्ध पावले उचलत असल्याचे स्पष्ट होते आहे. जे कोकण रेल्वेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल मानले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत असून, आम्ही १५०० कोटी रुपयांचे जुने कर्ज लवकरच संपवणार आहोत. हे कोकण रेल्वेच्या प्रगतीपथावरील महत्त्वाचे पाऊल आहे. कोकण रेल्वे ही देशातील एकमेव रेल्वे संस्था आहे जी सुरुवातीपासून नफ्यात राहिलीय. यावर्षी तब्बल १३०-१४० कोटी रुपयांचा नफा मिळण्याचा अंदाज आहे. हा नफा केवळ कर्जफेडीसाठी नव्हे, तर सेवा-विकासासाठीही वापरला जाणार आहे.” – संतोषकुमार झा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, कोकण रेल्वे