’ लहान मुले चक्रव्यूहात ’ पालकांमध्ये चिंता ’ पोलिसांची धडक मोहीम
पनवेलच्या सर्व पोलीस ठाण्यांना बिंगो जुगाराविरोधात कारवाई करण्याचे आदेश नवी मुंबई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी पोलिसांना दिले आलेत. या कारवाईची सुरुवात कामोठे वसाहतीपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी केली आहे.या जुगाराच्या गाळ्यातून तीन संगणक व आठ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले. लहान मुले या जुगाराकडे मोठय़ा प्रमाणात आकर्षित झाल्याचे उघडकीस आले असून पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
पनवेल तालुक्यामधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये असे ४५ बिंगो जुगार चालतात. कामोठेमधील सेक्टर ३४ येथील मेनफ्लॉवर या इमारतीमधील गाळा क्रमांक १५ मध्ये जगदीश पिल्लई, स्टॅलिन मुदलीयार व मनी मायनेर अशा तिघांना पोलिसांनी अटक केली. शंभर रुपये भरून या बिंगो जुगाराच्या अड्डय़ावर प्रवेश करा आणि ६० सेकंदांमध्ये हजारो कमवा, अशा पद्धतीने हा जुगार सुरू होता. तीन संगणक पोलिसांनी जप्त केले.
दिवाळीच्या सुट्टीत काही लहान मुले या बिंगो जुगाराच्या खेळाकडे खेचली गेली असल्याचा एक दूरध्वनी उपायुक्त विश्वास पांढरे यांना आल्यानंतर या जुगाराची पोलखोल झाली. अनेक कुटुंबांतील लहान मुले दिवाळीच्या सुट्टीमध्ये बिंगो जुगाराच्या धंद्यावर हजेरी लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. उपायुक्त पांढरे यांनी तालुक्यामध्ये विविध पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या व्यवसायाची विचारणा केली. त्यामध्ये एकूण ४५ व्यवसाय येथे सुरू असल्याचे त्यांना समजले. कामोठे येथे सर्वाधिक १७, खांदेश्वर येथे ६ व पनवेल शहर ९, कळंबोली २, खारघरमध्ये काही ठिकाणी हे व्यवसाय सुरू असल्याचे समजले. कामोठे येथील बिंगो जुगाराच्या पाठीमागे हॅपीसिंग नावाचा राजकीय व्यक्ती असल्याचे उपायुक्तांना समजले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. कामोठेमध्ये मागील वर्षी याच बिंगोमुळे कर्जबाजारी झालेल्या व्यापाऱ्याने व एका तरुण मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक रहिवाशांनी असा कोणताही जुगार आसपास सुरू असल्यास त्याबाबतची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना कळवावी. स्थानिक पोलिसांनी दाद न दिल्यास नागरिक विश्वास पांढरे यांच्या ९९२३४५६५६५ या भ्रमणध्वनी क्रमांकावरही संपर्क साधू शकतात, असे आवाहन करण्यात आले आहे.

बिंगो जुगार म्हणजे काय?
जेथे बिंगो जुगार चालतो तेथे दुकान अथवा खोलीच्या बाहेर कोठेही बिंगो नावाचे फलक झळकवलेले नसतात. नुसते फ्रायडे क्लोज असाच फलक असतो. बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला सायबर कॅफे वाटावे असे येथे संगणक लावलेले असतात. संगणकामध्ये ऑनलाइन दिसणारी ३६ आकडे असलेली चक्री येथे फिरताना दिसते. या बिंगो क्लबमध्ये येताना १०० रुपये भरून प्रवेश घ्यायचा आणि त्या शंभर रुपयांमध्ये या चक्रीवरील लकी आकडय़ांवर संगणकाच्या माऊसने कळ दाबायची. ६० सेकंदांमध्ये ३६ पैकी कितीही आकडे आपण नोंदवू शकता. ६० सेकंदांमध्ये रिझल्ट येतो आणि आपला निवडलेला आकडा आल्यास एका रुपयाचे ३७ रुपये याप्रमाणे विजेत्याला परताव्याचे रुपये मिळतात. लहान मुलांसोबत येथे तरुण मुले मोठय़ा प्रमाणात येतात. घरी आईवडिलांकडून कामाच्या निमित्ताने उकळलेले पैसे ते येथे संपवतात. काही मुले याच बिंगो जुगारामुळे गुन्हेगारीकडे वळली आहेत. विशेष म्हणजे उपायुक्त पांढरे यांनी बिंगो जुगाराची चौकशी केल्यावर हे व्यावसायिक एकही रीतसर परवाना पोलिसांना सादर करू शकले नाहीत.