मागण्या मान्य केल्याची राज्य कामगारमंत्र्यांची घोषणा 

माथाडी कामगारांच्या सर्व मागण्या राज्य शासनाने सोमवारी रात्रीच मान्य केल्यामुळे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाचे विजयी मेळाव्यात रूपांतर झाले. राज्य कामगारमंत्री विजय देशमुख व सरकारमधील आघाडीचे मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी माथाडींच्या विविध संघटनांच्या मेळाव्यात मागण्या मान्य केल्याची घोषणा केली. तसे पत्रच या वेळी माथाडी कामगारांच्या नेत्यांना देण्यात आले.

सरकारने फेब्रुवारी २०१६, सप्टेंबर २०१६, जानेवारी २०१८ मध्ये तीन अध्यादेश काढले होते. हे तीनही अध्यादेश माथाडींच्या विरोधात व अन्यायकारक आहेत, असे माथाडी कामगारांचे म्हणणे होते. त्यामुळे माथाडी कायद्याच्या कलम २१ बाबत केलेली तरतूद रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत कामगार व उद्योगमंत्र्यांची ३ एप्रिलला बैठक होणार आहे. त्यात कामगारांचे न्याय्य हक्क अबाधित ठेवण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले आहे. शासनाने काढलेले अध्यादेश मागे घेण्यात आले आहेत. माथाडी सल्लागार समितीची फेररचना करण्यात येणार आहे. माथाडी मंडळातील नोकरीत कामगारांच्या मुलांना संधी देण्याचे मान्य करण्यात आले आहे. सुरक्षा रक्षकांचे प्रश्न सोडवण्यात येणार असून माथाडी कामगार व कायद्याच्या अस्तित्वाला कुठेही धक्का लागणार नाही, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे माथाडी कामगारांमध्ये व नेत्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. माथाडींच्या एकजुटीमुळे हा निर्णय झाल्याचे सांगीतले जात आहे.

विजयी मेळाव्याला कामगार नेते अविनाश रामिष्टे, बळवंतराव पवार, गुलाबराव जगताप, पोपटराव देशमुख, पोपटराव पाटील, जयवंतराव पिसाळ, तानाजी कदम, नंदा भोसले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यंदा माथाडी कामगार कायद्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सरकारने साजरे करावे, अशी शिफारस मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल. अण्णासाहेब पाटील महामंडळाला आणखी ५०० कोटींचा निधी देऊन अध्यक्षाची निवड करण्यात येईल.

– विनोद तावडे, शिक्षणमंत्री

माथाडींच्या सर्व मागण्या मान्य केल्याची घोषणा करण्यात आली असली, तरीही मान्य केलेल्या मागण्यांवर मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत  जर शिक्कामोर्तब झाले नाही तर पुन्हा महाराष्ट्रभर आंदोलने करण्यात येतील. 

– शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष, माथाडी कामगार युनियन

राज्यभरातील माथाडी एकत्र आले होते. त्यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. माथाडी चळवळ मोडीत काढण्याचे षड्यंत्र रचणाऱ्यांना एकजुटीतून धडा शिकवला आहे. माथाडींवर अन्याय होऊ देणार नाही.

– नरेंद्र पाटील, सरचिटणीस, माथाडी कामगार