सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका ते सी.बी.डी. बेलापूर हा भाग नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत येत असून सदर मार्गाची मालकी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने व त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने त्याच्या दूरवस्थेविषयी ,सततच्या दिवाबत्ती विषयी प्रवाशी, नागरिकांकडून नवी मुंबई महानगरपालिकेस दोष दिला जात होता. याचा परिणाम नवी मुंबई शहराच्या स्वच्छ व सुंदर प्रतिमेवर सातत्याने होत आहे. ९ डिसेंबर २०२१ ला पालिकेकडे दिवाबत्ती हस्तातंरीत करण्यात आल्यानंतर पालिकेकडन हस्तांतरीत करण्यात आलेल्या दिवाबत्तीच्या कामासाठी १०.५४ कोटी खर्चातून महामार्गावरील एलईडी दिवाबत्ती लावली जाणार आहे. संबंधित ठेकेदाराला याचा कार्यादेश दिला आहे.त्यामुळे तात्काळ कामाला सुरुवता होणार आहे.

एलईडी दिव्यांमुळे वीजबचत होणार असून सातत्याने महामार्गावर होणारी पथदिव्यांची डोळेमिचकावणी बंद होणार आहे. दिवाबत्ती हस्तांतरित करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने ८ कोटी २९ लाखांची रक्कम पालिकेने प्रदान केली आहे.परंतू आर्थिक बोजा पालिका उचलत असताना विद्युत खांब्यावरील जाहीरात हक्कही प्राप्त होणे आवश्यक आहे.नाहीतर दुसऱ्याची वेदना आणी त्याला पालिकेचे औषधपाणी अशी स्थिती होणार आहे.तसेच एमएसआरडीसीच्या बेलापूर ,नेरुळ वाशी येथील उड्डाणपुलावील दिवाबत्तीची व्यवस्थाही भविष्यात पालिकेला हस्तांतरीत करुन घ्यावी लागेल अथवा. रस्ते उजेडात उड्डाणपुल अंधारात अशी स्थिती होण्याची शक्यता आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने नेरुळ येथील दोन तसेच एसबीआय कॉलनीसह ४ भुयारी मार्गाच्या देखभालीची जबाबदारीही घेतली आहे.

हेही वाचा : पनवेल : फेरीवाला व्यवसायाची पालिकेकडून अधिकृत संधी ; सर्वेक्षण व कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी शेवटचे आठ दिवस

नवी मुंबई महापालिका हद्दीतून जाणाऱ्या हा मार्ग उड्डाणपुलांसह हस्तांतरित करण्याचे प्रयत्न झाले होते. महामार्गावरील पालिका हद्दीतील दिवाबत्ती पालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी तत्कालिन आयुक्त डॉ.रामास्वामी ते अभिजीत बांगर एवढा कालावधी गेला होता .परंतू आता महामार्गावरील सातत्याने डोळे मिजकावणे तसेच अनेक वेळा बंदच दिवे पाहायला मिळणार नाहीत. अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत या मागणीबाबत पालिकेने वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आलेला होता. शहराच्या स्वच्छतेचा व मानांकनाचा साकल्याने विचार करून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सायन पनवेल महामार्गावरील नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील दिवाबत्ती महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही गतिमानतेने करण्याकडे विशेष लक्ष दिले.तसेच या मार्गाची आयुक्तांनी पाहणी करुन उद्यान व अभियांत्रिकी विभागाला सुशोभीकरणाबाबत निर्देशही दिले होते. महामार्गावरील दिवाबत्तीच व्यवस्था महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याची मागणी लक्षात घेऊन आयुक्तांनी गेल्यावर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाची संयुक्त बैठक घेतली होती.

हेही वाचा : नवी मुंबई : पावसामुळे टोमॅटोची आवक घटली ; दरात ८ ते १५ रुपयांची वाढ

पालिकेच्या पाठपुराव्यानंतर ही दिवाबत्ती व्यवस्था ९ डिसेंबर २०२१ ला पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आली होती. त्यावेळी बांधकाम विभागाकडून या मार्गावरील दिवाबत्तीच्या कामासाठी ८ कोटी २९ लाख रुपये पालिकेला हस्तांतरीत केले होते. त्यामुळे पालिकेने तात्काळ या कामासाठी पाहणी करुन या मार्गावरील नादुरुस्त फिटींग बदलणे व एलईडी फिटींग लावणे यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. पालिकेने सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करुन नुकतेच मे. रॉयल पॉवर टेक या कंपनीला या कामाचे कार्यादेश दिले असून एलईडी फिटींग लावण्याबरोबरच ५ वर्षाची देखभाल दुरुस्तीही संबंधित ठेकेदाराला दिली आहे. या मार्गावरील एलईडी फिटींगमुळे महिना वीजबिलात ९४ लाखाची बचतही होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरीत करण्यात आलेल्या दिवाबत्तीच्या खांबांवरील जाहिरातीचे अधिकारही पालिकेला मिळण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.

नवी मुंबई महापालिका हद्दीतील व सार्वजनिक बांधकाम विभागाची दीवाबत्ती व्यवस्था हस्तातरीत केल्यानंतर या खांबावरील जाहीरात फलक लावून त्यातून देखभाल दुरुस्तीचा व वीजवापराचा खर्च करण्यात यावा यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह तत्कालिन आयुक्त रामास्वामी एन. यांनीही हा प्रश्न लावून धरला होता. परंतू जाहीरात फलकाच्या ठेक्याचा वाद न्यायालयात सुरु असल्याने पालिकेला जाहीरातीमधून अद्याप उत्पन्न मिळणार नसल्याने पालिकेलाच तोपर्यंतचा खर्च करावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विद्युत व्यवस्थेसाठीच्या १४९४ फिटींग,३८८ खांब,२९ हायमास्ट पालिकेकडे हस्तांतरीत झाले असून त्याची दुरावस्था दूर केली जाणार आहे.

हेही वाचा : पनवेल : शेकाप, राष्ट्रवादी पोखरुन शिंदेगट होतोय बळकट

लवकरच कामाला सुरवात …

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पालिकेकडे हस्तांतरीत झालेल्या महामार्गावरील दिवाबत्तीची दुरावस्था आहे. महामार्गावरील दिवाबत्ती हस्तांतरण झाल्याने पालिकेने दिवाबत्तीची देखभाल, दुरूस्ती तसेच वीजवापर खर्च पालिकेमार्फत केला जाणार असल्याने वीजबील कमी येण्यासाठी एलईडी लाईट व्यवस्था लावली जाणार आहे. ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला आहे. उडडाणपुलावरील वीजव्यवस्था जाहीरात हक्कासह पालिकेला द्यावी याबाबतही पालिका प्रयत्न सुरु आहेत. – सुनील लाड कार्यकारी अभियंता ,परिमंडळ १

एमएसआरडीसीच्या उड्डाणुलावरील वीजव्यवस्थाही पालिकेकडे हवी….

नवी मुंबई महापालिका हद्दीत बेलापूर, उरणफाटा,नेरुळ, जुईनगर,सानपाडा, वाशी.तुर्भे, येथे उड्डाणपुल असून एमएसएरडीसीकडे असलेल्या उड्डाणपुलावरील वीजव्यवस्था पालिकेकडे हस्तांतरीत करण्याची मागणी केली आहे..नाहीतर रस्ते उजेडात व उड्डाणपुल अंधारात अशी अवस्था निर्माण होऊ शकते.