नवी मुंबई : करोनाकाळात डॉक्टर वापरत असलेले निळे हातमोजे पुन्हा धुवून विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नसल्याचा असा आरोप अनेकदा केला जातो. अशातच नवी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.
प्रशांत सुर्वे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पावणे एमआयडीसी मधील गामी इंडट्रीएल पार्क येथील गाळा क्रमांक २९ आणि ८० येथे डॉक्टर वापरात असलेले निळे रबरी हातमोजे धुवून पुन्हा बंदिस्त करून विकण्यासाठी तयार केले जात होते. साहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल राख यांना मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री हा छापा टाकण्यात आला. या छाप्यात २६३ गोण्या भरून निळे रबरी हातमोजे आढळून आले. याची संख्या किमान पाच साडेपाच लाख असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या शिवाय १७ यंत्रे आणि धुतलेले हातमोजे वाळवणारी ब्लोअर मशीन असा माल जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी दिली.
टोळीचा समावेश?
वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक शहरात एजन्सीला काम दिले जाते. सदर एजन्सी प्रतिनिधी सरकारी आणि खासगी रुग्णालय दवाखाने, आदी ठिकाणाहून हा कचरा गोळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. हातमोजे एकदाच वापरण्यासाठी तयार करण्यात आलेले असतात. मात्र एवढय़ा मोठय़ा प्रमाणात आढळून आलेले हातमोजे प्राथमिक तपासात औरंगाबाद वा परिसरातून आणले गेले असावे यात एखाद्य वैद्यकीय कचरा गोळा करणाऱ्या एखाद्या एजन्सी कर्मचाऱ्याचाही समावेश असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.