सर्वांनाच आपल्या मराठीचा आपल्या भाषेचा अभिमान असलाच पाहीजे. मराठी घरातील मुले रोजगार, व्यवसायानिमित्त संपूर्ण जगभरात विविध देशांमध्ये जात असून त्यांच्या माध्यमातून तिथेही मराठी संस्कृतीची मुळे रुजत आहेत ही आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत सुप्रसिध्द कवी अशोक नायगावकर यांनी सांगीतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लंडनमधील गणेशोत्सवाचे व इतर उत्सवांचे अनुभव कथन करीत परदेशातही मराठीचा गौरव होत असल्याचा आनंद व्यक्त केला. आपल्याकडे घरातील तिस-या पिढीला तुम्ही बोललेल्या अनेक मराठी शब्दांचा अर्थ कळत नाही हे घराघरातील चित्र असले तरी त्यांच्याशी आवर्जुन मराठीत बोलून आपण आपले भाषा संवर्धन करीत राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवडा शुभारंभप्रसंगी पालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी कवी अशोक नायगावकर यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसेच रसिकांशी दिलखुलास संवाद साधला.

हेही वाचा >>> नवी मुंबई शहरातील उद्यानांच्या वेळांबाबत धोरणात्मक निर्णय ? नागरीकांकडून सातत्याने उद्यानांच्या वेळ वाढवून देण्याची मागणी

नुकत्याच झालेल्या अशोक नायगावकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीने आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी त्यांचा विशेष सन्मान करीत त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अशोक नायगावकर यांच्या पत्नी  शोभना नायगावकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले व  संजय काकडे याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

नवी मुंबई हे स्वच्छतेमध्ये देशातील नेहमी अग्रभागी असणारे शहर असून येथील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे अनुकरण इतरही शहरांनी करायला हवे असे आहे. आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ राहिला तर आपली मनेही आपोआप स्वच्छ राहतात असे त्यांनी सागीतले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आकर्षक आणि भव्य मुख्यालयातील ॲम्फीथिएटरमध्ये कार्यक्रम करायला येताना मला ग्रीक, रोमन व्यासपीठांवर जाण्याचा भास होत असल्यांचे सांगत  नवी मुंबईचे काम उत्कृष्ट असून मागील वर्षी कवी संमेलनात एखाद्या शहरात जाता येता लोकांच्या नजरेला कवितेच्या चांगल्या ओळी पडाव्यात अशी इच्छा व्यक्त केली होती ती नवी मुंबईने लगेच पूर्ण केली. यामधून शहरातील सांस्कृतिक वातावरण विकासासाठी नवी मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

हेही वाचा >>> नवी मुंबई : स्कुल व्हॅनला कारने ठोकले ; एक विद्यार्थी किरकोळ जखमी

मायबोली मराठी या विषयावर उपस्थितांशी सुसंवाद साधताना सुरुवातीला समुहाने मराठीचा पाठ म्हणवून घेत  नायगावकर यांनी मराठी भाषेला लवकरच अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर आपल्या प्रसिध्द कविता सादर करताना त्यामधील खुसखुशीत व मार्मिक भाष्याने त्यांनी वातावरण हसते खेळते ठेवले. महिलांची लक्षणीय उपस्थिती लक्षात घेत  कौटुंबिक कवितांवर भर दिला.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असल्याचे सांगत यावर्षीच्या भाषा संवर्धन पंधरवड्याची सुरुवात  अशोक नायगावकर यांच्या उपस्थितीत होत आहे हा आनंदयोग असल्याची भावना व्यक्त केली. मराठी भाषेतून शिकलेली अधिका-यांची ही बहुधा शेवटची पिढी असेल असे सांगत मराठी भाषेचा निस्सिम अभ्यासक म्हणून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.कवी  अशोक नायगावकर यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत निर्णय या जनजागृतीपर लघुचित्रफितीचे अनावरण कऱण्यात आले. तसेच उपस्थितांसह स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण करण्यात आली. 

शुध्दलेखनाच्या दिशेने विषयावर मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात सुसंवाद

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून गुरुवारी १९ जानेवारी रोजी भाषा अभ्यासक  वैभव चाळके ‘शुध्दलेखनाच्या दिशेने….’ या विषयांतर्गत सकाळी ११ वा. शुध्दलेखनाचे शासकीय नियम व लेखन या विषयावर मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात सुसंवाद साधणार आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi poet ashok naigaonkar attend nmmc marathi language conservation fortnight event in navi mumbai zws
First published on: 18-01-2023 at 00:15 IST