नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची शनिवारी दुपारी पहाणी केल्यानंतर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे हे विमानतळ ३१ मार्च २०२५ रोजी पर्यत कार्यान्वित होऊ शकेल, अशी माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. शुक्रवारी नागपूरात बोलताना शिंदे यांनी हे विमानतळ याच वर्षी नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात सुरु होईल असे सांगितले होते.

शनिवारी सिडको तसेच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमीटेड (एनएमआयएएल) कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर शिंदे यांनी ही नवी तारीख जाहीर केली. या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच घेतील, असेही ते यावेळी म्हणाले. मुंबईच नव्हे तर देशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणारे हे विमानतळ डिसेंबर २०२४ पर्यत प्रवाशांच्या सेवेत असावे असे लक्ष्य आम्ही समोर ठेवले आहे. मात्र याठिकाणच्या कामाची सद्यस्थिती आणि इतर प्राधिकरणांमार्फत सुरु असलेल्या पुरक कामांचे अवलंबित्व लक्षात घेतले तर हा अंदाज थोडा अधिकचा म्हणायला हवा अशी स्पष्टोक्ती शिंदे यांनी यावेळी केली.

हेही वाचा…पहिल्याच दिवशी उरण – खारकोपर लोकल ट्रेनला उत्स्फूर्त प्रतिसाद

असे असले तरी या कामाची भौतिक आणि आर्थिक प्रगती लक्षात घेता ३१ मार्च २०२५ पर्यत मात्र या विमानतळाचा पहिला आणि दुसरा टप्पा प्रवाशांच्या सेवेसाठी नक्की खुला होईल असा दावा त्यांनी यावेळी केला. विमानतळाच्या पहिल्या दोन टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी सुरु होऊ शकेल. तसेच वर्षाला दोन कोटी प्रवाशी वाहून नेण्याची क्षमता या दोन टप्प्यात आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाचे एकूण पाच टप्पे असून पुढील तीन टप्प्यात ४ टर्मिनलचे नऊ कोटी प्रवाशी क्षमता असणारे हे विमानतळ असेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

जल वाहतूकीनेही जोडण्याचा प्रयत्न

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जल वाहतूकीने जोडण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून शुक्रवारी ‘अटल सेतू’चे झालेले लोकार्पण हा याच आखणीचा भाग होता असे शिंदे यांनी स्पष्ट केले. नेरुळ-उरण रेल्वेस लागूनच हा प्रकल्प असून या विमानतळाच्या तिन्ही बाजूंनी मेट्रो प्रकल्पाची आखणीही अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय कुलाबा-अलिबाग-विमानतळ अशा मार्गावर जल वाहतुकीचेही नियोजन केले जात आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा…अटल सागरी सेतूला प्रचंड प्रतिसाद ; चिर्ले मार्गाने पनवेल आणि उरणच्या दिशेने वाहने सुरू

पाच वर्षात ३० कोटी विमान प्रवासी

देशातंर्गत विमान प्रवासाची मागणी दिवसागणिक वाढत असून करोना पूर्व काळातील १५ कोटी विमान प्रवाशांचा आकडा आपण नुकताच गाठला आहे, असा दावा शिंदे यांनी केला. पुढील पाच वर्षात ही संख्या ३० कोटी प्रवाशांच्या घरात असेल असे ते म्हणाले. पुढील १० वर्षात संपूर्ण देशात आणखी ७५ नवी विमानतळे उभारण्याचा आमचा प्रयत्न असून असे झाल्यास देशात २०० विमानतळ कार्यान्वित होतील असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुडीत खात्यातील विमान उद्योग हा इतिहास

दोन दशकांच्या काळात देशातील काही विमान कंपन्या या बुडीत खात्यात जमा झाल्या. हा आता इतिहास असून अगदी नजीकच्या काळात ४ नव्या विमान कंपन्या सुरु झाल्या आहेत. देशातील विमान कंपन्यांनी अत्याधुनिक पद्धतीच्या नव्या विमानांच्या खरेदीसाठी विक्रमी मागणी नोंदवली असून २०२८ पासून ही नवी विमाने सेवेत दाखल होतील. आंतरराष्ट्रीय सेवा देणाऱ्या भारतीय विमान कंपन्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.