दिवाळीच्या निमित्ताने बाजारात सध्या चायना वस्तूंची रेलचेल सुरू आहे. आकाशकंदिलापासून ते दिवाळीत देण्यात येणाऱ्या भेटवस्तू आकर्षक सजावटीतून ग्राहकांना दिल्या जात आहेत. शोभनीय आणि अल्प दरात या वस्तू उपलब्ध झाल्याने या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा कल वाढला आहे.

दिवाळीच्या सणासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. पारंपरिक कागदी आकाशकंदिलांना मागे टाकत चायना बनावटीच्या रंगीबिरंगी विद्युत तोरणे आणि इतर उपकरणे बाजारपेठेत आली आहेत. किमान ५० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत या वस्तू विकल्या जात आहेत. आकर्षक सजावट आणि वजनाने हलक्या असणाऱ्या या सजावटीच्या वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्यांनतर ग्राहकांनी पारंपरिक वस्तूंना मागे टाकत चायना वस्तूंना पंसती दिली आहे. फुलपाखरांच्या आकारातील तितली, विद्युत झुंबर, पणती, विजेवर चालणारे चक्र, फुलमाळातील दारावरचे तोरण अशा विविध चायना वस्तूची खरेदी केली जात आहे. यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत आलेल्या या वस्तू काहीशा स्वस्त असल्या तरी दीर्घकाळ टिकणाऱ्या असल्याने ग्राहकांनी यालाच पंसती दिली आहे, तर दिवाळीच्या निमित्ताने लहान मुलांसाठी चायना बनावटीच्या बंदुका, विजेवर चालणारे चक्र आदी साहित्य खरेदी करण्यात बच्चे कंपनीने गर्दी केली आहे.

आकाशकंदील वाढत्या महागाईबरोबर महागले आहेत. ग्राहकांनी चायनानिर्मित आकाशकंदिलांना पसंती दिली आहे. या वस्तू अत्यंत स्वस्त असल्याने ग्राहकांबरोबर आम्हालादेखील चांगला फायदा होत आहे.
-आशीष पाटील, विक्रेते