उरण : येथील ओएनजीसीच्या प्रकल्पात सोमवारी दुपारी दोन सव्वा दोन वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग विझविण्यात यश आले असून यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसल्याचा दावा ओएनजीसीच्या पी आर विभागाने केला आहे. आग ओएनजीसीच्या अरबी समुद्रातून येणाऱ्या कच्च्या तेलाच्या प्रमुख वाहिन्या शेजारी लागली होती.

मात्र ही आग लागल्या नंतर आगीचा डोम उसळला होता. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट उसळत होते. या आगीनंतर प्रकल्पा शेजारी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा म्हणून ओएनजीसी कडे जाणारे मार्ग आडविण्यात आले होते. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या बंबाना प्रचारण करण्यात आले होते.

ओएनजीसी प्रकल्पात लागलेली आग विझविण्यात आली असल्याची माहीती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे. तर दुपारी दोन नंतर लागलेली आग विझविण्याचे काम सायंकाळ नंतर ही सुरू होते. या प्रकल्पात आशा प्रकारच्या अनेकदा आगी लागल्या असून यात काही नागरिक आणि प्रकल्पातील कामगारांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आगी नंतर ओएनजीसी प्रकल्पा शेजारील नागाव व केगाव या दोन्ही गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.