शल्यचिकित्सक नसल्याने रुग्णांची अन्यत्र रवानगी
नेरुळ येथील मासाहेब मीनाताई ठाकरे माता-बालरुग्णालयाच्या देखण्या आणि प्रशस्त सात मजली इमारतीतील जवळपास सर्वच कक्षांचे काम बंद आहे. नागरिकांनी कररूपात भरलेल्या पैशातून कोटय़वधी रुपये खर्च करून उभारलेल्या या रुग्णालयाचा कारभार केवळ बाह्य़रुग्ण विभाग आणि प्रसूती विभागापुरताच सीमित राहिला आहे. त्यापैकी प्रसूती विभागासाठी शल्यचिकित्सक नसल्यामुळे प्रसूतीत गुंतागुंत असल्यास गर्भवतींना अन्यत्र पाठवण्यात येते. त्यात त्यांचे हाल होतात.
नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयांचा भूमिपूजन सोहळा ९ ऑगस्ट २००९ रोजी क्रांतिदिनाच्या मुहूर्तावर पार पडला. या रुग्णालयांचे काम दोन वर्षांत म्हणजेच २०११ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना त्यासाठी तब्बल सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागली. या काळात रुग्णालय उभारणीचा खर्च दुप्पट झाला. एवढा वेळ आणि निधी खर्च केल्यानंतरही या रुग्णालयात सर्व सुविधा कधी मिळणार, असा प्रश्न आजही नेरुळ आणि परिसरातील रहिवाशांना पडला आहे. मीनाताई ठाकरे रुग्णायाची रुग्णक्षमता १०० असूनही सध्या तिथे केवळ ५० खाटांची सोय आहे. पहिल्या मजल्यावरील लघुशस्त्रक्रिया विभागाला टाळे ठोकण्यात आले आहे. दुसऱ्या मजल्यावरील संमोहन कक्ष, लसीकरण कक्ष बंद आहेत. तिसऱ्या मजल्यावरील शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभागालाही कुलूप आहे. चौथा मजला हा रेकॉर्ड रूम म्हणून वापरला जात आहे. त्यावरील सर्व मजले बंदच आहेत. येथे जीवरक्षक प्रणाली नाही. लहान मुलांसाठी वॉर्मर नाही. फिजिशियन, सर्जनही उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णवाहिकेने वाशी येथे उपचारांसाठी सोडण्यात येते.रुग्णांची तपासणी केल्यानंतर काही गंभीर बाब लक्षात आल्यास रुग्णाला दाखल करून न घेता वाशी रुग्णालयचा संदर्भ दिला जातो. शल्यचिकित्सक नसल्यामुळे रक्तदाब वाढला किंवा अचानक काही समस्या निर्माण झाली, तर संदर्भ देण्याशिवाय पर्याय राहत नाही असे, सांगण्यात आले.
या रुग्णालयात बाह्य़रुग्ण विभागात रोज ४००-५०० रुग्ण येतात. दंत चिकित्सा विभाग, अस्थिरोग, कान-नाक-घसा, त्वचारोग हे बाह्य़रुग्ण विभाग सुरू आहेत. मात्र गंभीर रुग्ण आल्यास उपचारांसाठी वाशी, तेरणा यांसारख्या रुग्णालयांचा संदर्भ दिला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. येथे केस पेपर काढण्यासाठी दोनच काउंटर आहेत. त्यामुळे रुग्णांना लांबलचक रांगेत उभे राहावे लागते. चप्पल ठेवण्याची व्यवस्था नसल्यामुळे चपलांचा ढीग साचलेला असतो.
दुसऱ्या मजल्यावरील प्रसूती कक्षात १० रुग्ण तर प्रसूतीनंतर जिथे दाखल केले जाते त्या कक्षात ४० रुग्ण असल्याचे सूत्रांनी सांगितले. तुर्भे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना नेरुळ रुग्णालयात पाठवण्यात आल्यामुळे कर्मचारी व सफाई कामगार यांची संख्या जास्त आहे. प्रसूती कक्षात परिचारिका व तळमजल्यावर सफाई कामगार गप्पा मारताना दिसतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर येथे सर्व उपकरणे व सुविधा असत्या तर या रुग्णालयाचा रुग्णांना मोठा फायदा झाला असता. गेल्या महिन्यात या रुग्णालयात एक महिला बाथरूममध्ये भोवळ येऊन पडल्यामुळे तिला दुखापत झाली होती. अशा वेळी पुढील उपचारांसाठी वाशी येथे पाठवावे लागले. येथे एक महिन्यापूर्वी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. महिन्याल एनएस-१ चे २० किट येतात. डेंग्यूच्या पुढील तपासणीसाठी वाशी येथेच पाठवण्यात येते.
नेरुळ रुग्णालयातील उपकरणांसाठी बुधवारी निविदा उघडण्यात येणार आहेत. कंत्राटी स्वरूपात काम करायला कुणीही तयार नसते. त्यामुळे कायमस्वरूपी नियुक्ती करण्यासाठी अ आणि ब वर्गातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत प्रक्रिया सध्या सुरू आहे. – रमेश निकम, मुख्य वैद्यकीय अधिकारी