scorecardresearch

धार्मिक स्थळांवर एमआयडीसीची कारवाई

गुरुवारी सहा बेकायदा धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्यात आली आहे.

midc
एमआयडीसी

रबाळे परिसरातील सहा मंदिरे जमीनदोस्त; पोलिसांचा फौजफाटा तैनात 

नवी मुंबई शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गुरुवारी रबाळे एमआयडीसीतील सहा धार्मिक स्थळांवर एमआयडीसीकडून कारवाई करण्यात आली. यावेळी कोणाच्या भावना दुखावल्या गेल्याने कारवाईस अडथळा येऊ नये, म्हणून मोठय़ा प्रमाणात पोलीस बदोबस्त तैनात करण्यात आला होता.

एमआयडीसीच्या भूखंडावरील १०० धार्मिक स्थळावर कारवाईचे आदेश आहेत. त्यानुसार गुरुवारी सहा बेकायदा धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्यात आली आहे. तसेच उर्वरित धार्मिक स्थळांवरील कारवाई सुरूच राहणार असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

नवी मुंबईत बेकायदा इमारतींप्रमाणेच बेकायदा धार्मिक स्थळांचे प्रमाणही जास्त आहे. या धार्मिक स्थळांवर १७ डिसेंबर २०१७ पर्यंत कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुंषगाने नवी मुंबईतील धार्मिक स्थळांबाबत एक संयुक्त बैठक पालिकेत झाली होती. या बैठकीला सिडको, एमआयडीसी, पालिका आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘एमआयडीसी’च्या भूखंडावरील १०० बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

सिडकोकडूनही कारवाई सुरू

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बेकायदा धार्मिक स्थळांचे स्थलांतर, नियमित केलेली स्थळे आणि पाडकामाची कारवाई होणारी धार्मिक स्थळे अशा तीन प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले आहे. सप्टेंबर २००९ नंतरच्या सर्व स्थळांवर कारवाई केली जात आहे. सिडकोकडूनदेखील आतापर्यंत १९ बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आल्याचे सिडकोचे अतिक्रमण अधिकारी संदीप राजपूत यांनी सांगितले.

उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्या अनुषंगाने रबाळे येथील एमआयडीसी परिसरातील सहा धार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.
-यशंवत मेश्राम, उपअंभियता, एमआयडीसी.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Midc action on illegal religious structures in rabale area

ताज्या बातम्या