दरवर्षी हजारो मैलांचे अंतर कापून उरणमध्ये येणाऱ्या परदेशी पक्ष्यांचे पारंपरिक अधिवास वेगाने नष्ट होत असूनही यंदा या पाहुण्यांचे मोठय़ा संख्येने उरण खाडी किनारी आगमन झाले आहे. बंदर विकासाच्या कामांमुळे या पक्ष्यांचा अधिवास असलेल्या पाणथळींवर घाला आला आहे.
उरण तालुक्यातील पाणजे, डोंगर, करळ, दास्तान तसेच इतर ठिकाणी दर वर्षी हजारो मैलांचा प्रवास करीत विविध जातींचे हजारो पक्षी येतात. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या उरण तालुक्यातील खाडी किनाऱ्यावर दर वर्षी रशिया, सैबेरिया तसेच पाकिस्तानातून हजारो पक्षी स्थलांतर करून येतात. यात फ्लेमिंगोंसह इतर शेकडो जातींच्या पक्ष्यांचा समावेश आहे. या खाडीकिनाऱ्यावर या पक्ष्यांचे मुख्य खाद्य असलेले कीटक आणि मासे यांचा मोठा साठा आहे. किनाऱ्यावरील मिठागरात मोठय़ा प्रमाणात आढळणारे रेपा (लहान कोळंबी) हे या पक्ष्यांचे आवडते खाद्य असल्याची माहिती उरणमधील पक्षिमित्र आशीष घरत यांनी दिली. परिस्थिती प्रतिकूल असूनही हजारो पक्ष्यांचे थवे उरणकिनारी उतरले आहेत. त्यांचे निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी पक्षिप्रेमी दर वर्षी येत आहेत. तसेच काही संस्थांकडून या परिसरात मुलांच्या सहली आणल्या जातात आणि त्यांना स्थलांतर करणाऱ्या या परदेशी पाहुण्यांची माहिती दिली जाते, अशी माहिती पक्षिप्रेमी जयवंत ठाकूर यांनी दिली.
अधिवास नष्ट होण्याच्या मार्गावर
उरणमधील पाणजे ते डोंगरीदरम्यानच्या मिठागर परिसरात दर वर्षी हजारो पक्षी येतात. परंतु याच परिसरात जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या मातीच्या भरावाचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे दास्तान फाटा येथील पानथळीतही भराव सुरू आहे. त्यामुळे उरणमधील पक्ष्यांचे मुख्य अधिवास नष्ट होऊ लागले आहेत.