पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी २४ जून ही नवी आंदोलनाची तारीख निवडली आहे. यापूर्वी तीनवेळा मोठ्या आंदोलनानंतरही राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने यावेळी आक्रमक पवित्रा घेत बेलापूर येथील सिडको महामंडळाच्या कार्यालयाला घेराव घालणार असल्याचा इशारा पनवेल येथील पत्रकार परिषदेत देण्यात आला. पनवेल शहरातील आगरी समाज सभागृहात बुधवारी पत्रकार परिषद लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने आयोजित करण्यात आली होती.

पनवेल, उरण व नवी मुंबईच्या आगरी समाजाच्या आणि इतर जातींच्या प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन गेल्या वर्षी या आंदोलनाची सूरुवात केली. दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला मिळण्यासाठी पहिल्यांदा १० जूनला मानवी साखळी आंदोलन घेण्यात आले. त्यानंतर गेल्या वर्षी २४ जूनला सिडकोला घेराव आंदोलन घेतले, मात्र कायदा सुव्यवस्थेच्या पोलिसांच्या विनवणीनंतर बेलापूर येथील मोकळ्या जागेवर आंदोलनात प्रकल्पग्रस्त एकवटले. त्यानंतर ९ ऑगस्ट क्रांतिदिनी मशाल मोर्चा, १७ मार्च भूमिपुत्र परिषद, सिडको वर्धापन दिनाचा काळा दिन आंदोलन, त्यानंतर २४ जानेवारीला विमानतळाचे काम रोखण्याचे आंदोलनाचा इशारा देण्यात आला मात्र तेथेही पोलिसांनी सर्व रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त उभा केल्याने विमानतळापासून काही अंतरावरील मोकळ्या मैदानात आंदोलकांची सभा घेऊन आंदोलन शांत करण्यात आले.

प्रकल्पग्रस्त आंदोलक संयमी आहेत. त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा देत हा अखेरचा लढा म्हणत बुधवारी पनवेल शहरातील आगरी समाज सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष व माजी खासदार रामशेठ ठाकूर, सहचिटणीस संतोष केणे, खजिनदार जे. डी. तांडेल यांनी पत्रकारांना आंदोलनासंदर्भात माहिती देत यावेळी गप्प बसणार नसल्याची भूमिका मांडली. यावेळी सिडकोकडे विमानतळाच्या पूर्वीचा नामकरणाचा ठराव विखंडित करून लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाचा ठराव करावा असे निवेदन दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी त्यावर सिडको अथवा शासनाने कोणताही निर्णय केलेला नाही. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या सततच्या आंदोलनामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव अद्याप मंत्रिमंडळाच्या बैठकीत अथवा विधानसभेत आणला गेला नसल्याचे कृतीसमितीच्या सदस्यांनी सांगितले.