गढूळ पाण्याची खारघरवासियांना समस्या

हजारो सदनिकांमध्ये गढूळ पाणी पुरवठा सिडको महामंडळाच्या जलवाहिनीतून होत असल्याने नागरीक संतापले आहेत.

water
(फोटो सौजन्य- संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल: गढूळ पाण्यामुळे खारघरवासिय त्रस्त झाले आहेत. मागील चार दिवसांपासून खारघर वसाहतीमधील सेक्टर 34 ते 36 मधील शेकडो इमारतींमधील हजारो सदनिकांमध्ये गढूळ पाणी पुरवठा सिडको महामंडळाच्या जलवाहिनीतून होत असल्याने नागरीक संतापले आहेत. याच परिसरातील डॉ. स्वप्नील पवार यांनी सिडको मंडळाच्या पाणी पुरवठा विभागाकडे याबाबत तक्रार केली आहे.

खारघर वसाहतीमध्ये एप्रील आणि मे महिन्यात दरवेळी पाणी पुरवठा नियमीत असल्याच्या तक्रारी होतात. मात्र यंदा अशा तक्रारी कमी झाल्या आहेत. मागील तीन वर्षांपुर्वी येथील लोकप्रतिनिधी आणि सिडको मंडळातील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी या तक्रारीमुळे हैराण झाले होते. लाखो रुपयांचे घर खरेदी करुन नागरिकांना खारघरमध्ये पाणी मिळत नसल्याने शेकडो नागरिकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची वेळ आली होती. यंदा अपुरा पाणी पुरवठा ही समस्या नसली तरी गढूळ पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. खारघरमध्ये हेटवणे धरणातून पाणी पुरवठा सिडको मंडळाच्या माध्यमातून केला जातो.

खारघर वसाहतीच्या काही भागातच गढूळ पाण्याची समस्या आहे. नेमकी कुठे जलवाहिनीला गळती लागलीय याचा शोध खारघरमधील सिडको मंडळाचे पाणी पुरवठा विभागातील अधिकारी शोध घेत आहेत. डॉक्टर पवार हे काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा कमिटीचे उपाध्यक्ष आहेत. तातडीने सिडको मंडळाने जलवाहिनीला लागलेल्या गळतीची दूरुस्ती करावी अन्यथा दूषीत पाण्यामुळे या परिसरात रुग्ण वाढ होऊ शकते अशी भिती डॉ. पवार यांनी व्यक्त केली आहे. सिडको मंडळाचे खारघर विभागाचे पाणी पुरवठा शाखेचे उपअभियंता राहुल सरोदे यांच्याकडे या तक्रारीबाबत खारघरच्या नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 17:07 IST
Next Story
नवी मुंबई: एपीएमसीची सुरक्षा बेभरोसे, बाजारातील चोरीच्या घटनांनी व्यापारी मेटाकुटीला
Exit mobile version