आशिया खंडातील सर्वात मोठी घाऊकबाजारपेठ असलेल्या तुर्भे येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला (एपीएमसी) नवी मुंबई पालिकेने घनकचऱ्याच्या विल्हेवाटपोटी सात कोटी ८० लाख रुपयांची नोटीस बजावली आहे. एपीएमसीच्या पाच घाऊक बाजारपेठेत दिवसाला साठ मेट्रीक टन घनकचरा तयार होत असून हापूस आंब्याच्या मोसमात हा कचरा शंभर टनापेक्षा जास्त निर्माण होत आहे. हा कचऱ्याची नवी मुंबई पालिका तुर्भे येथील क्षेपणभूमीवर वाहतूक करुन विल्हेवाट लावत आहे.

पालिकेच्या स्वच्छता उपक्रमाला तुर्भे येथील एपीएमसी बाजारात दररोज हरताळ फासला जात आहे. या घाऊक बाजारात हजारो वाहने आणि मजुर कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी २४ शौचालये असून त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याविरोधात माथाडी नेते व आमदार नरेंद्र पाटील यांनी आवाज उठविला होता. याच एपीएमसीत येणाऱ्या वाहनामुळे सुका कचरा मोठय़ा प्रमाणात निर्माण होतो. हा कचरा साठ मेट्रीक टन आहे. मात्र हापूस आंब्याच्या मोसमात हा कचरा शंभर टनापेक्षा जास्त असतो. नवी मुंबई पालिका हा कचरा जमा करून तुर्भे येथील क्षेपणभूमीवर वाहतूक करुन त्याची विल्हेवाट लावते. या प्रक्रियेसाठी एपीएमसी पालिकेला प्रक्रिया भाडे देत नाही. कचरा वाहतुकीचा खर्च सर्वसाधारपणे ४५० ते ५०० रुपये आहे. त्यामुळे दिवसाला पालिका या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी तीस हजार रुपये खर्च करीत आहे. आतापर्यंत मोफत सेवा दिल्याने एपीएमसीला त्याचे महत्त्व नसल्याचे मत पालिका प्रशासनाने व्यक्त केले आहे. राज्य सरकारच्या एका आदेशाने सर्व कृषी समित्यांनी त्यांच्या आवारात शंभर किलोपेक्षा जास्त कचरा जमा होत असल्यास स्वत:चा कचरा प्रक्रिया विभाग सुरू करावा असे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार एपीएमसीने साठ टन कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रस्ताव तयार केला आहे.

सोसायटय़ांमध्ये कचऱ्यावर प्रकिया

पालिकेने ओला सुका कचऱ्याचे वर्गीकरण सर्व सोसायटय़ांना बंधनकारक केले आहे. त्यामुळे काही मोठय़ा सोसायटय़ांनी आवारातच कचऱ्यावरील प्रक्रिया सुरू केली आहे. शहरातील ४५ टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊ लागली असून हे एकूण कचऱ्याच्या १५ टक्के प्रमाण आहे. हे प्रमाण वाढून १०० मेट्रीक टन होण्याची शक्यता आहे.

एपीएमसी आवारातील कचऱ्याची पालिका विल्हेवाट लावत आहे. या बदल्यात आतापर्यंत शुल्क आकारण्यात आलेले नव्हते. पालिकेला एपीएमसीमधून जास्त उत्पन्न नाही. त्यामुळे कचरा हाताळणीच्या बदल्यात ही शुल्क भरण्याची नोटीस देण्यात आलेली आहे.   – डॉ. रामास्वामी एन. आयुक्त, नवी मुंबई पालिका.