नवी मुंबई महापालिकेकडून मध्यवर्ती जागांचा शोध

नवी मुंबई : तीन वर्षांपूर्वी कोपरखैरणे व नेरुळ येथे सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांना मिळत असलेला प्रतिसाद आणि शिक्षणातील गुणवत्ता पाहता नवी मुंबई पालिका उत्तर व दक्षिण नवी मुंबईत आणखी दोन सीबीएसई शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे. त्यासाठी मध्यवर्ती जागांचा पाहणी केली जात आहे.

यातील एक शाळा ही शिक्षण क्षेत्रातील संस्थांकडून संचालित केली जाणार आहे तर एक शाळा पालिकेचा शिक्षण विभाग चालविणार आहे. सध्या सुरू असलेल्या दोन शाळा अशाच प्रकार संचालन केल्या जात आहेत.नवी मुंबई पालिकेच्या शाळांना चांगला प्रतिसाद आहे. राज्याच्या इतर शहरातील पालिका शाळा बंद पडत असताना नवी मुबंई पालिकेने शाळांचा विस्तार करावा लागत आहे.

महामुंबई क्षेत्रात विविध उद्योग धंद्याच्या निमित्ताने होणारी लोकसंख्येची आवक याला कारणीभूत आहे. त्यामुळे पालिका दरवर्षी शाळांचा विस्तार करीत असून अधिक सक्षम शैक्षणिक सुविधा उपलब्द करून देत आहे. तीन वर्र्षांपूर्वी पालिकेने कोपरखैरणे सेक्टर १४ व नेरुळ सेक्टर ४८ येथे केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दोन शाळा सुरू करण्याचे धारिष्ट्य दाखविले आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभत असून दोन्ही ठिकाणी अनुक्रमे एक हजार ४०० व एक हजार ८०० विद्यार्थी संख्या आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमापेक्षा स्पर्धात्मक भविष्यात टिकून राहण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांचा उपयोग होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेक पालकांचा कल सीबीएसई शाळांकडे आहे. स्पर्धात्मक परीक्षांसाठी हा अभ्यासक्रम कामी येत असल्याचे यापूर्वी अनेक वेळा दिसून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेने सुरू केलेल्या या सीबीएसई

प्रयत्नाना अधिक गती देण्याच्या दृष्टीने पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आणखी दोन सीबीएसईच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थी संख्या असणाऱ्या ऐरोली व बेलापूर विधानसभा  मतदार संघातील जागांचा शोध घेतला जात आहे.