पाणी, घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी; पाच दिवसांत २६ कोटी रुपये जमा

नोटाबंदीच्या निर्णयानंतर नवी मुंबई पालिकेच्या तिजोरीत कररूपाने अवघ्या पाच दिवसांत २६ कोटी २८ लाख रुपयांची भर पडली आहे. कर भरण्यास नागरिकांनी अधिक भर दिल्याने आर्थिक स्थिती सुधारली आहे.

पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी अनेक सवलती दिल्या आहेत. त्याअनुषंगाने महापालिकाच्या बाहेर कर भरण्यासाठी या बंद नोटा घेऊन नागरिकांनी कररूपाने पैसे भरण्यासाठी गर्दी केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर पालिकेच्या नऊ विभाग कार्यालयाच्या बाहेर पाणी आणि घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. शासन निर्णयानुसार११ ते १४ नोव्हेंबर या सुट्टीच्या कालावधीतही पालिकेच्या विभाग कार्यालयात करभरणा केंद्र अधिक वेळेपर्यंत सुरू ठेवण्यात आले होते.

जुन्या नोटा पाणी आणि घरपट्टीच्या माध्यमातून भरल्याने पालिकेला दिलासा मिळाला आहे. अवघ्या पाच दिवसांत २६ कोटी ६८ लाख इतकी रक्कम नोटाबंदीच्या निर्णयाने तिजोरीत जमा झाल्याने त्याचा वापर आता विविध नागरी विकासकामांसाठी करण्यात येणार आहे.

आयुक्तांनीही घेतलेल्या कठोर भूमिकेमुळेही पालिकेच्या तिजोरीत आर्थिक भर पडली आहे. आता नोटाबंदीचीही त्यात भर पडली आहे. नागरिकांनी इतर दिवशीही कर भरून शहरांच्या विकासाला हातभार लावण्याचे आवाहन या विषयी माहिती देताना अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी केले आहे.

ऑनलाइन सेवा 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांनी कर भरणा करता यावा यासाठी ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक नागरिकांनी ऑनलाइन सेवेचा फायदा घेत कर भरणा केला आहे. अशा प्रकाराचा अभिनव उपक्रम राबविणारी नवी मुंबई पालिका ही पहिली पालिका आहे.

पालिका तिजोरीत कररुपात जमा झालेली रक्कम

दिनांक                   जमा रक्कम

११ नोव्हेंबर               १३ कोटी ५० लाख

१२ नोव्हेंबर              ३ कोटी १६ लाख

१३ नोव्हेंबर              १ कोटी ५९ लाख

१४ नोव्हेंबर              ५ कोटी ९ लाख

१५ नोव्हेंबर             ३ कोटी २३ लाख